मुंबई: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारनं ब्रेक द चेन सुरू केलं होतं. त्यासाठी जिल्हाबंदी, लॉकडाऊन, विकेण्ड लॉकडाऊन अशा विविध योजना राबवल्या होत्या. कोरोनाची रुग्णसंख्या कमी होऊ लागल्यानंतर हळूहळू महाराष्ट्रात अनलॉक सुरू करण्यात आलं आहे. 5 टप्प्यांमध्ये महाराष्ट्रात अनलॉक करण्यात येत आहे.
मुंबईमध्येमध्ये मात्र संपूर्ण अनलॉकसाठी अवकाश लागेल. सध्या मुंबई लेव्हल 3 मध्ये राहणार आहे. मुंबईत आजपासून 27 जूनपर्यंत लेव्हल 3चे निर्बंध कायम राहतील अशी माहिती मुंबईच्या आयुक्तांनी दिली आहे.
मुंबईत पॉझिटीव्हिटी रेट ३.७९% आणि रिक्त ऑक्सिजन बेड ३०.५६% आहेत. मात्र तरीही कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे. या आकडेवारीनुसार मुंबई पहिल्या टप्प्यामध्ये आहे. मात्र, खालील बाबींचा विचार करुन मुंबईला लेव्हल ३चेच निर्बंध लावण्यात येणार आहेत.
- मुंबईची भौगोलिक रचना आणि लोकसंख्या घनतेचे प्रमाण
- मुंबईत एमएमआर प्रदेशातून लोकलने दाटीवाटीनं प्रवास करुन येणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या
- टास्क फोर्स आणि तदन्यांनी व्यक्त केलेली तिसऱ्या लाटेची शक्यता
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्राचा दुसऱ्या लेव्हलमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आज पासून सर्व दुकानं नियमित सुरु होणार आहेत. मात्र मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह, हॉटेल, बार, रेस्टोरेन्ट, पन्नास टक्के क्षमतेनं सुरु असणार आहेत.
मुंबईत लोकल सेवा कधी सुरू होणार? विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
कोरोना संपल्याशिवाय मुंबईतील लोकल सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरु होणार नाही अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांनी नागपूरात दिली. एकीकडे मुंबईतील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्यानं लोकल प्रवास सर्वसामान्यांसाठी कधी सुरु होणार याकडे मुंबईकरांचं लक्ष लागलं होतं. मात्र वडेट्टिवांच्या विधानामुळे मुंबईकरांचा हिरमोड झाला.