मुंबई ट्रॅफीक पोलिसांना मिळाले कॅमेरे, हुज्जत पडणार महागात

ट्रॅफीक पोलिसांशी यापुढे रस्त्यावर वाद घालाल तर तो महागात पडू शकतो.

Updated: Jul 19, 2017, 07:45 PM IST
मुंबई ट्रॅफीक पोलिसांना मिळाले कॅमेरे, हुज्जत पडणार महागात  title=

अजित मांढरे, प्रतिनिधी, झी मीडिया मुंबई : ट्रॅफीक पोलिसांशी यापुढे रस्त्यावर वाद घालाल तर तो महागात पडू शकतो. मुंबई ट्रॅफीक पोलिसांना शिविगाळ करणे, मारहाण करणे असले प्रकार केलेत तर जेलची हवा खायला लागू शकेल.

ट्रॅफीक पोलिसांना आता वायफाय कॅमेरे देण्यात आलेत. त्यामुळे कारवाई दरम्यान पोलिसांशी घातलेली हुज्जत रेकॉर्ड होणार आहे. हे रेकॉर्डींग न्यायालयात पुरावा म्हणून सादर केलं जाईल.

मुंबई ट्रॅफीक पोलिसांना शर्टावर लावण्याचे हे कॅमेरे देण्यात आले आहेत. हे वायफाय कॅमेरे आहेत. जे थेट पोलीस कंट्रोल रूमशी जो़डलेत. त्यामुळे कॅमेऱ्यात चित्रीत होणारी प्रत्येक गोष्ट कंट्रोल रूममध्ये रेकॉर्ड होते. गरज पडल्यास हे फुटेज न्यायालयातही वापरलं जाणार आहे.

पोलिसांवर होणारे हल्ले, पोलीस आणि नागरिकांमध्ये होणारी बाचाबाची टाळण्यासाठी हे कॅमेरे देण्यात आलेत. हळूहळू राज्यात प्रत्येक पोलिसांकडे हे कॅमेरे जाणार आहेत. त्यामुळे पोलिसांशी हुज्जत घालाल तर सावधान...