Outgoing PM Unique Farewell Video Goes Viral: राजकारणी म्हटल्यावर त्यांच्याबरोबर असलेल्या लोकांचा लवाजमा आणि बडेजाव आलाच. सामन्यपणे जगातील बरेचसे राजकारणी अशाच पद्धतीने राहतात. अनेकजण तर सत्तेमधून पायउतार होताना नियम आणि मूल्यांना बाजूला सारुन पदावर कायम राहण्याचाही प्रयत्न करतात. मात्र युरोपमधील एका देशात एक वेगळेच चित्र पाहायला मिळालं. येथील पंतप्रधानांनी 14 वर्षांपासूनचा आपला कार्यकाळ अचानक संपवला. नव्या व्यक्तीच्या हाती पंतप्रधानपदाची सूत्रं सोपवली आणि चक्क सायकलवरुन अगदी सूटाबुटात ही व्यक्ती पंतप्रधान निवासस्थानातून बाहेर पडली. सध्या या व्यक्तीवर कौतुकाचा वर्षाव होत असून त्यांच्या या अनोख्या एक्झिटचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. एका मराठमोळ्या अभिनेत्यानेही या व्यक्तीचा व्हिडीओ पोस्ट करत त्याचं कौतुक केलं आहे.
ज्या व्यक्तीबद्दल आपण बोलतोय त्याचं नाव मार्क रुटे (Mark Rutte). मार्क हे नेदरलँडचे पंतप्रधान म्हणून 14 वर्ष कार्यरत होते. पंतप्रधान कार्यालयाचा निरोप घेतानाचा मार्क याचा व्हिडीओ चर्चेत आहे. मार्क यांच्यासाठी आयोजित केलेला निरोप समारंभ संपल्यानंतर ते पंतप्रधान कार्यालयाच्या दारात आले. त्यांनी भावी पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्याशी हस्तांदोलन केलं. त्यानंतर आपल्या कोटच्या खिशातून चक्क सायकलची चावी काढली आणि कार्यालयाच्या दाराशी उभ्या असलेल्या सायकलवर बसून निघून गेले. त्यांची ही कृती कॅमेरात कैद करण्यासाठी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी कॅमेरा घेऊन त्यांच्या आजूबाजूने पळत असल्याचं पाहायला मिळालं.
मार्क यांनी साधेपणाने अगदी एकट्याने पंतप्रधान कार्यालयातून अशा साध्या पद्धतीने एक्झिट घेतल्याचं पाहून कार्यालयातील सर्व कर्मचारी टाळ्या वाजवून आपल्या या काही क्षणापूर्वी माजी बॉस झालेल्या व्यक्तीचं कौतुक करत होते. मार्क यांनी आपल्या खांद्यावरील जबाबदारी डिक स्कूफ यांच्याकडे सोपवली आहे.
मराठमोळे अभिनेते किरण माने यांनीही आपल्या एक्स अकाऊंटवरुन मार्क यांचा हा व्हायरल व्हिडीओ शेअर करताना, "'फकीरी' अशी असते भावांनो!" असं म्हटलं आहे. "भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांचा एकही आरोप नसल्यामुळे 'टेफ्लॉन मार्क' अशी उपाधी लाभलेले आणि 14 वर्ष नेदरलँडचे पंतप्रधान असलेले मार्क रुटे यांनी आज अचानक स्वत:हून पंतप्रधानपद सोडलं. आपला पदभार नवीन पंतप्रधानांना दिला. स्वत:च्या सायकलचं लॉक काढलं आणि निघाले घरी पॅडल मारत. कॅमेरामन मागे धावत होते पण त्यांनी कॅमेर्याकडे पाहिलेही नाही. उगाच नाही त्यांना देश 'मिस्टर नॉर्मल' म्हणूनही संबोधत होता," अशी कॅप्शन किरण मानेंनी या व्हिडीओला दिली आहे. तसेच, "उच्चशिक्षित पण साध्या रहाणीसाठी प्रसिद्ध असलेल्या रूटे यांनी एका हायस्कूलमध्ये सामाजिक शास्त्र शिकवायला सुरूवातही केली आहे," असंही किरण माने म्हणालेत. आपल्या पोस्टच्या शेवटी किरणा मानेंनी, " जो फकीरी मिजाज रखते हैं, वो ठोकरों में ताज रखते हैं!" अशा ओळीही लिहिल्या आहेत.
'फकीरी' अशी असते भावांनो !
भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांचा एकही आरोप नसल्यामुळे 'टेफ्लाॅन मार्क' अशी उपाधी लाभलेले आणि चौदा वर्ष नेदरलँडचे पंतप्रधान असलेले मार्क रुटे यांनी आज अचानक स्वत:हून पंतप्रधानपद सोडलं... आपला पदभार नविन पंतप्रधानांना दिला, स्वत:च्या सायकलचं लाॅक काढलं आणि… pic.twitter.com/eCNePs4yha— Kiran Mane (@kiranmane7777) July 6, 2024
दरम्यान, मार्क यांच्याकडून पंतप्रधान पदाची सूत्रं हाती घेणारा डिक स्कूफ हे गुप्तचर यंत्रणेचे माजी प्रमुख आहेत.
After 14 years in power, this is how former Dutch Prime Minister Mark Rutte left the Prime Minister's Office after completing the ceremony of officially handing over power to his successor, Dick Schoof.#netherlands pic.twitter.com/exux8saX0D
— Kiran Bedi (@thekiranbedi) July 6, 2024
67 वर्षीय डिक स्कूफ यांची पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मार्क रुटे आता नाटोमध्ये सेक्रेटरी जनरल म्हणून काम पाहणार असल्याचं समजतं.