मुंबई : लॉकडाऊनच्या घोषणेबाबत मुंबईतील टॅक्सी संघटना आणि चालकांनी संताप व्यक्त केला आहे. रिक्षा चालकांना पॅकेज मग आम्ही काय पाप केलं आहे ? असा प्रश्न टॅक्सी संघटनांनी उपस्थित केलाय. आम्ही बहुसंख्य टॅक्सीचालक परप्रांतीय म्हणून आम्हाला पॅकेज नाही असं समजायचं का ? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आलाय.
पॅकेज देण्याबाबत राजकारण का ? असा प्रश्न टॅक्सी चालकांनी राज्य सरकारला विचारला आहे. आधीच टॅक्सी चालवतांना बंधने आहेत प्रवासी संख्या तुरळक आहे. आता लॉकडाऊनमध्ये कोण टॅक्सीतुन प्रवास करणार ? असा प्रश्न टॅक्सी चालकांनी विचारला आहे.
राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढच्या 15 दिवसांसाठी कडक निर्बंध लागू केले आहेत. सरकारने कडक लॉकडाऊन जाहीर न करता पार्शल लॉक डाऊन जाहीर केलाय. यामध्ये व्यापाऱ्यांचे मोठं नुकसान असल्याचे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे उपाध्यक्ष ललित गांधी यांनी म्हटलंय.
सरकारने लॉकडाऊन जाहीर करताना व्यापाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. छोट्या व्यापाऱ्यासाठी सरकार काहीं ना काही पॅकेज जाहीर करतील अशी अपेक्षा होती, पण सरकारे निराशा केल्याचे ललित गांधी म्हणाले.
ठराविक व्यापार सुरू आणि ठराविक व्यापार बंद यामुळे मूळ उद्देश सफल होईल का याबद्दल आमच्या मनात शंका असल्याचेही ते म्हणाले.