Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (BMC) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत 398 जणांना मलेरियाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. तर, 139 जणांना डेंग्यू (dengue) आणि 208 जणांना गॅस्ट्रोनं (Gastro) गाठल्याचं आकडेवारीतून निष्पन्न झालं. पालिकेच्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये मागील महिन्यांच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये झपाट्यानं घट झाल्याचं दिसून आलं.
सप्टेंबर महिन्यात स्वाईन फ्लूची (Swine Flu) लागण झालेले 6 रुग्ण समोर आले. तर, या आठवड्यात H1N1 चा एकही रुग्ण आढळलेला नाही. एकिकडे हे संकट कमी होत असतानाच दुसरीकडे मात्र दुषित पाण्यामुळं होणारे आजार बळावताना दिसत आहेत.
मागील काही दिवसांमध्ये शहरात लेप्टोस्पायरोसिसच्या (Lepto) आजाराचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत असून, ही नागरिकांसाठी आणि आरोग्य यंत्रणांसाठीही चिंतेची बाब ठरत आहे. गेल्या आठवड्याभरात शहरात लेप्टोचे 9 नवे रुग्ण आढळले. त्याआधीच्या आठवड्यात हा आकडा 12 रुग्ण इतका होता.
वातावरणात होणारे बदल आणि साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी घरीच उपचार घेण्यापेक्षा नजीकच्या पालिका रुग्णालयात, डॉक्टरकडे किंवा खासगी रुग्णालयात जाऊन तातडीनं चाचण्या आणि उचपार घ्यावेत असं आवाहन पालिका अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
ताप, श्वास घेण्यात अडचण, त्वचा किंवा ओठ निळे पडणं अशी लक्षणं दिसल्यास तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घ्या, असं पालिकेकडून सांगण्यात येत आहे.
आजार | सप्टेंबर महिन्यातील रुग्ण | जानेवारी 2022 पासूनचे रुग्ण |
हिवताप(मलेरीया) | 398 | 2990 |
लेप्टो | 27 | 190 |
डेंग्यू | 139 | 492 |
गॅस्ट्रो | 208 | 4260 |
कावीळ | 45 | 414 |
चिकुनगुन्या | 2 | 12 |
स्वाईन फ्लू | 6 | 304 |