मुंबई : मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या शिवनेरी आणि अश्वमेध या एसटी गाड्यांच्या तिकीट दरात कपात करण्यात आली आहे. ही कपात सोमवार ८ जुलै २०१९ पासून लागू होणार आहे. मुंबई-पुण्याच्या शिवनेरी आणि अश्वमेधच्या भाड्यात ८० ते १२० रूपयांपर्यंतची कपात करण्यात आली आहे. तिकीट दर कमी करण्याची घोषणा परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे.
कमी झालेले नवे तिकीट दर येत्या सोमवार पासून, म्हणजे ८ जुलै पासून लागू होणार आहेत. गेली १५ वर्षे मुंबई-पुणे मार्गावर अत्यंत लोकप्रिय असलेली एसटीची 'शिवनेरी' ही बस सेवा या मार्गावरील कोणत्याही दळणवळण सेवेपेक्षा किफायतशीर, सुरक्षित आणि आरामदायी आहे.
सध्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ७ मार्गावर शिवनेरीच्या दिवसभरात ४३५ फेऱ्या केल्या जातात, याद्वारे दरमहा सुमारे दीड लाख प्रवाशांना दर्जेदार सेवा दिली जात आहे. या प्रतिष्ठीत बस सेवेची लोकप्रियता लक्षात घेऊन, हि प्रतिष्टीत सेवा सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोहोचवून जास्तीतजास्त प्रवासी संख्या वाढवणे, हा तिकीट दर कमी करण्याचा उद्देश असल्याचे श्री. रावते यांनी स्पष्ट केले.
मागील काही काळात मुंबई-पुणे मार्गावर कमी दरात चालणाऱ्या ओला, उबेर सारख्या टॅक्सी सेवेमुळे शिवनेरीच्या प्रवासी संख्येवर परिणाम झाला आहे. तिकीट दर कमी केल्यामुळे हा प्रवाशी वर्ग सुद्धा शिवनेरीकडे वळेल.
एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने सध्या प्रवाशांना या मार्गावर उपलब्ध असलेल्या वाहतूक व्यवस्थेचा विचार करून स्पर्धात्मक तिकीट दर कपातीचा प्रस्ताव सादर केला. त्यानुसार लवचिक भाडेवाढ अथवा कपातीच्या संदर्भात एसटी महामंडळाला राज्य परिवहन प्राधिकरणाने दिलेल्या विशेष अधिकारानुसार ही दर कपात करण्यात आली आहे.
येत्या सोमवार पासून कमी झालेले नवीन तिकीट दर लागू होतील, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली आहे.