कंगना, रंगोलीला १० नोव्हेंबरला हजर राहण्याची मुंबई पोलिसांची नोटीस

अभिनेत्री कंगना रणौतला मुंबई पोलिसांनी १० नोव्हेंबरला हजर राहण्याची नोटीस पाठवली आहे.

Updated: Nov 3, 2020, 10:07 PM IST
कंगना, रंगोलीला १० नोव्हेंबरला हजर राहण्याची मुंबई पोलिसांची नोटीस  title=
फोटो : इंस्टाग्राम

मुंबई :  अभिनेत्री कंगना रणौतला (Kangana Ranaut) मुंबई पोलिसांनी १० नोव्हेंबरला हजर राहण्याची नोटीस पाठवली आहे तर कंगनाची बहिण रंगोलीला ११ नोव्हेंबरला हजर राहण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे. दोघींविरोधात बांद्रे पोलीस स्टेशनमध्ये धार्मिक तेढ निर्माण केल्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. याआधीही मुंबई पोलिसांनी कंगना आणि तिच्या बहिणीला चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस पाठवली होती. 

अभिनेत्री कंगना रणौत आणि तिची बहीण रंगोली यांच्या विरोधात मुंबईतल्या वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. वांद्रे न्यायालयाने हे आदेश दिलेत. त्यामुळे कंगना हिच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. मुस्लिम असल्याने आपल्याला काम न दिल्याचा आरोप करत, साहिल सय्यद याने वांद्रे न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सुनावणीदरम्यान कंगनाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

कंगनाने मुंबईचा पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तान असा उल्लेख करतही तिने ट्विट केले होते. त्या प्रकरणीही तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले गेले. कंगना रणौत आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांच्याविरोधात शहरातील वकिलांनी बुधवारी दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. सोशल मीडिया पोस्टद्वारे दोन धार्मिक गटांमधील वैर वाढवल्याचा आरोप करण्यात आला होता. 

वांद्रे न्यायालयात कंगनाविरोधात दोघांनी याचिका दाखल केली होती. याचिका करताना म्हटले होते, कंगना बॉलिवूडमधील हिंदू आणि मुस्लीम कलाकारांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. याशिवाय ती हिंदू-मुस्लीम समुदायात धार्मिक तेढ वाढवत आहे. कंगना ही अनेकवेळा आक्षेपार्ह ट्विट करत आहे. त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होत आहे. तसेच बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे, असे म्हटले होते.