Sonu Nigam Father Theft Case: गायक सोनू निगमचे (Sonu Nigam) वडील आगम कुमार (Agam Kumar) यांच्या घरी चोरी झाल्यानंतर मनोरंजन क्षेत्रात खळबळ उडाली होती. चोराने आगम कुमार यांच्या घरातून तब्बल 72 लाख रुपये लंपास केले होते. याप्रकरणी सोनू निगमची बहिण निकिता निगमच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला होता. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी 24 तासात आरोपीला अटक केली आहे. घरातील ड्रायव्हरच चोर निघाला असून पोलिसांनी त्याच्याकडून सर्व रक्कम जप्त केली आहे.
22 मार्चला निकिता निगम यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी व्यक्तीने बनावट चावीचा वापर करुन घरात प्रवेश केला होता. यानंतर त्याने बेडरुमच्या कपाटात ठेवलेले 72 लाख रुपये चोरी केले होते. चोरी झाल्यानंतर निकिता यांनी आपला चालक रेहान उर्फ रमजान ताजुद्दीन मुजावर याच्यावर संशय व्यक्त केला होता.
रमजान ताजुद्दीन मुजावर 8 महिन्यांपूर्वी आगम कुमार यांच्याकडून चालक म्हणून नोकरीला होता. पोलिसांना आपले खबरी तसंच तांत्रिक मदतीच्या सहाय्याने रेहान अंधेरीत येत असल्याची माहिती मिळाली. यानंतर त्यांनी सापळा रचत त्याला अटक केली. पोलिसांनी चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी आरोपीकडून 70 लाख 70 हजार रुपये जप्त केले आहेत.
आगम कुमार यांनीच आरोपी चालकाला आपल्याकडे कामाला ठेवलं होतं. पण काम नीट करत नसल्याने त्याला कामावरुन काढून टाकण्यात आलं होतं. याचाच राग मनात धरुन त्याने 22 मार्चला संधी साधत घरात घुसून चोरी केली होती. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
ओशिवरा पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनी साळुंखे, पोलीस निरीक्षक सचिन जाधवर, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद नागराळ, संदीप पाटील, पोलीस हवालदार गणेश हंचनाळे, शैलेश शिंदे, पोलीस नाईक सिराज मुजावर, पोलीस शिपाई विशाल नाईक, राजेंद्र चव्हाण, किरण बारसिंग, मनिष सकपाळ, अजित चोपडे आणि नवनाथ गिते या कारवाईत सहभागी होते.