CIDCO Navi Mumbai Property : कोरोना काळात ठप्प झालेला रिअल इस्टेटचा (Real estate) व्यवसाय पुन्हा एकदा तेजीत आला आहे. मुंबई पाठोपाठ नवी मुंबईत (Navi Mumbai) मोठी डील झाली आहे. सिडकोच्या भूखंडासाठी 52 वर्षाच्या इतिहासातील विक्रमी बोली लागली आहे. 13 भूखंड विक्रीतून सिडकोला 719 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे (CIDCO Navi Mumbai Property). भूंखडासाठी काढण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियेत चांगली बोली लागली.
चार महिन्यांपूर्वी 52 वर्षांच्या इतिहासात सिडकोच्या भूखंडांना विक्रमी दर प्राप्त झाला होता. यानंतर पुन्हा एकदा सिडकोच्या भूखंड विक्री योजनेमध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक 6 लाख 72 हजार 651 रुपये प्रति चौरस मीटर विक्रमी दर सिडकोला मिळाला आहे. या भूखंड विक्री योजनेद्वारे 13 भूखंडांची विक्री करुन सिडकोच्या तिजोरीत तब्बल 719 कोटी 25 लाख रुपयांचा निधी जमा होणार आहे.
विशेष म्हणजे या भूखंड विक्री योजनेत नेरुळ सेक्टर-4 येथील ज्या भूखंड क्रमांक-23 ला 6 लाख 72 हजार 651 रुपये प्रति चौरस मीटर विक्रमी दर प्राफ्त झाला आहे. तो भूखंड गेली कित्येक वर्षे नवी मुंबईतील एका राजकीय पदाधिकाऱ्याने हडप करण्याचा प्रयत्न चालविला होता.
काही महिन्यांपूर्वी सदर भूखंड सिडकोने ताब्यात घेऊन त्याची निविदेद्वारे विक्री केली. जवळपास अडीच हजार चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या या भूखंडाच्या विक्रीतून सिडकोला 165 कोटी 42 लाख रुपये प्राप्त होणार आहेत. सदर भूखंडाला ऍरामस हेवन एलएलपी या कंपनीने सर्वाधिक बोली लावली आहे. यापूर्वी सानपाडा सेक्टर- 20 येथील भूखंडाला 5 लाख 54 हजार रुपये इतकी सर्वाधिक बोली लागली होती. या भूखंड विक्रीतून सिडकोला कोट्यावधी रुपयांचा महसूल प्राप्त झाली आहे.
मुंबईत एका व्यावसायिकाने एका फ्लॅटसाठी तब्बल 120 कोटी रुपये मोजलेत. गृहनिर्माण क्षेत्रातल्या तज्ज्ञांनुसार आतापर्यंतची ही सगळ्यात मोठी डील असून एखाद्या व्यक्तीने एका फ्लॅटसाठी पहिल्यांदाच इतके पैसे मोजलेत. या व्यावसायिकाचे नाव नीरज बजाज असं असून त्याने वरळीतील अॅनी बेझंट रोडवर असणा-या इमारतीत पन्नासाव्या मजल्यावर 1 हजार 587 चौरस मीटरचा हा फ्लॅट खरेदी केलाय. बजाज यांना या महागड्या फ्लॅटसह 8 कार पार्किंगची जागाही मिळणार आहे. याआधी 2017 साली व्यावसायिक देवेन मेहता यांनी पेडर रोड इथं लोधा अल्टामाउंटमधल्या एका फ्लॅटसाठी 57 कोटी 45 लाख रुपये मोजले होते.