रस्त्यावर झाडांखाली कार पार्क करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, मुंबई महापालिकेने घेतला 'हा' निर्णय

Mumbai : रस्त्याच्या कडेला झाडांखाली लावलेली वाहने वेळीच हलवावीत, वाहनांचे नुकसान झाल्यास महानगरपालिका जबाबदार नाही असं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

देवेंद्र कोल्हटकर | Updated: Apr 18, 2024, 07:29 PM IST
रस्त्यावर झाडांखाली कार पार्क करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, मुंबई महापालिकेने घेतला 'हा' निर्णय  title=

Mumbai :  पावसाळा सुरू होण्यापूर्वी खबरदारी म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने मोठ्या आणि धोकादायक ठरू शकणाऱ्या झाडांच्या फांद्या सुयोग्य आणि शास्त्रीय पद्धतीने छाटणीची कामं हाती घेतली आहेत. मात्र या कामांमध्ये रस्त्याच्या कडेला लावलेल्या वाहनांचा (Car Parking) अडथळा येत आहे. महानगरपालिकेच्या  (Mumabi Municipal Corporation) विभाग कार्यालयांकडून त्या-त्या परिसरातील झाडांच्या छाटणीबाबत आधीच कळवण्यात येतं. तसंच या कार्यवाहीत प्रशासनाला सहकार्य करून आपापली वाहने अशा ठिकाणांहून काढून घ्यावीत, असं आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. झाडांच्या फांद्या छाटणीदरम्यान जर दुर्दैवाने वाहनांचे नुकसान झाले, तर महानगरपालिका त्यास जबाबदार राहणार नाही, असं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 

झाडांच्या फांद्या छाटणीचं काम
मुंबई महानगरात सर्व्हेक्षण केल्यानंतर धोकादायक झाडांच्या फांद्या छाटणीचं उद्यान विभागाकडून सुरू आहे. मात्र ही छाटणी सुरू असताना रस्त्याच्या कडेला लावलेल्या वाहनांचा अडथळा येत आहे. यातून अनेकदा कर्मचारी आणि वाहनधारकांमध्ये वाद झाल्याचे प्रसंग घडले आहेत. कामांमध्ये व्यत्यय देखील येतो आहे. वाहनांचे नुकसान होवू नये म्हणून महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयाकडून त्या-त्या परिसरातील झाडांच्या छाटणीबाबत आधी कळवण्यात येतं. त्यामुळे निश्चित केलेल्या वेळेनुसार आपापली वाहने संबंधित ठिकाणाहून काढून सुरक्षित अशा अन्य ठिकाणी न्यावीत. प्रशासनाने आवाहन करूनही जर नागरिकांनी संबंधित ठिकाणांहून वाहने काढली नाहीत आणि फांद्या छाटणीदरम्यान दुर्दैवाने वाहनांचे नुकसान झाले तर महानगगरपालिका प्रशासन त्यास जबाबदार राहणार नाही, असे स्पष्ट करण्यात आलं आहे.

मुंबईत झाडांची संख्या
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात साधारणपणे 29 लाख 75 हजार झाडं आहेत. यापैकी 15 लाख 51 हजार 132  एवढी झाडे खासगी संस्थांच्या आवारांमध्ये आहेत. तर 10 लाख 67 हजार 641 झाडं शासकीय इमारती तसंच आस्थापनांच्या परिसरांमध्ये आहेत. एकूण झाडांपैकी 1 लाख 86 हजार 246 झाडे ही रस्त्यांच्या कडेला आहेत. यंदा मुंबई महानगरात एकूण 1 लाख 12 हजार 728 झाडांची छाटणीचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी 12  एप्रिल 2024 अखेरपर्यंत 15 हजार 821 झाडांची छाटणी झाली आहे. 7 जून 2024 अखेरपर्यंत उर्वरित 96 हजार 907 झाडांची छाटणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट उद्यान विभागानं ठेवलं आहे. मृत आणि कीड लागलेली तसेच वाकलेली 414 झाडे सर्वेक्षणादरम्यान आढळली आहेत. यापैकी 338 झाडे काढून टाकण्यात आली असल्याचं उद्यान अधीक्षक  जितेंद्र परदेशी सांगितलं. खासगी जागेतील धोकादायक झाडांची छाटणी करावयाची असल्यास संबंधित विभाग कार्यालयातील उद्यान अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असं आवाहनही जितेंद्र परदेशी यांनी केलं आहे.

3 हजार 690 जणांना नोटिसा
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या झाडांची निगा महानगरपालिकेद्वारे नियमितपणे राखण्यात येते. तथापि, गृहनिर्माण सहकारी संस्था (हाऊसिंग सोसायटी), शासकीय - निमशासकीय संस्था, खासगी जागा याठिकाणी असणाऱ्या झाडांची निगा घेण्याची सर्व जबाबदारी ही संबंधित मालकाची किंवा वापरकर्त्याची असते. गृहनिर्माण संस्था (हाऊसिंग सोसायटी), शासकीय-निमशासकीय संस्था, खासगी जागा इत्यादींमध्ये असणाऱ्या वृक्षांच्या छाटणीकामी, संतुलित करण्याबाबत महानगरपालिकेने 3 हजार 690 नोटिसा दिल्या आहेत.