मुंबई : त्यांनी आयुष्याची 68 वर्षं एकमेकांसोबत सुखाचा संसार केलाय.
आता त्यांना एकत्रच या जगाचा निरोप घ्यायचाय. 77 वर्षांच्या इरावती लवाटे आणि 87 वर्षांचे नारायण लवाटे. या दोघांनीही राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी केलीय. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारं हे जोडपं... एकत्र जगण्याचं वचन त्यांनी पाळलं. आता मरणाच्या दारातही त्यांना एकत्रच जायचंय. गेली 68 वर्षं सुखाचा संसार करणारे ईरावती आणि नारायण लवाटे.
शाळेच्या माजी मुख्याध्यापिका असलेल्या ईरावती आणि माजी सरकारी कर्मचारी असलेले नारायण. आता त्यांचं आयुष्य मावळतीकडं झुकलंय. त्या दोघांनीही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून इच्छामरण देण्याची मागणी केलीय. साधारणपणे जे भयंकर रोगानं आजारी आहेत, कोमामध्ये आहेत, त्यांना इच्छामरणाचा पर्याय उपलब्ध असतो.
पण या प्रकरणात इच्छामरणाची मागणी करणा-या दोघांचीही प्रकृती ठिकठाक आहे. भारतात इच्छामरणाला कायदेशीर मान्यता नाही. पण 75 वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला इच्छामरणाचा पर्याय उपलब्ध असावा, अशी त्यांची मागणी आहे.
दरम्यान, इच्छामरणाला संमती देण्यास डॉक्टरांनी जोरदार विरोध केलाय. या दाम्पत्याशी संवाद वाढवून, त्यांची इच्छा मरणाची इच्छाच संपवून टाकली पाहिजे, असं डॉक्टरांना वाटतंय.
आयुष्यात कठोर निर्णय घेण्याची लवाटे दाम्पत्याची ही पहिलीच वेळ नाहीय... याआधी देखील त्यांनी मूल होऊ द्यायचं नाही, असा संकल्प केला... आणि आयुष्यात तो संकल्प पाळला. आता पुरेपूर आयुष्य जगल्यानंतर या दोघांनाही एकत्रच या जगाचा निरोप घ्यायचाय... पण त्यांची ही अंतिम इच्छा पूर्ण होईल का? त्यांना इच्छामरणाचा अधिकार मिळेल का?