गणेशोत्सवाआधीच महापालिकेचा मंडळांना धक्का; दहा फुटी गणेश मूर्तींच्या विसर्जनास मनाई

Ganeshotsav 2023 : मुंबईत सध्या गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरु असताना मुंबई महापालिकेने गणेश भक्तांना मोठा धक्का दिला आहे. दहा फुटांपेक्षा जास्त उंचीच्या गणेशमूर्तींचे विसर्जन गणेश घाटात करण्यास पालिकेने बंदी घातली आहे.

आकाश नेटके | Updated: Aug 22, 2023, 08:13 AM IST
गणेशोत्सवाआधीच महापालिकेचा मंडळांना धक्का; दहा फुटी गणेश मूर्तींच्या विसर्जनास मनाई title=
(फोटो सौजन्य - PTI)

Mumbai News : मुंबईत (Mumbai) सध्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची (ganeshotsav 2023) जोरदार तयारी सुरु झाली आहे. मात्र त्याआधीच प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाने गणेश भक्तांना मोठा धक्का दिला आहे. मुंबई महापालिकेने (BMC) घेतलेल्या एका निर्णयामुळे गणेशभक्तांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. मुंबई किनारा मार्ग प्रकल्पातील पुलाचे (Mumbai Coastal Road Project) काम सुरू असल्याने वरळीतील गणेश घाटात (लोट्स जेट्टी) येथे गणेश मूर्तींचे विसर्जन (Ganesha idols) करण्यास मुंबई महापालिकेने बंदी घातली आहे. विसर्जन करताना भरतीवेळी दहा फुटांपेक्षा उंच गणेशमूर्तींमुळे पुलाच्या कामात समस्या निर्माण होऊ शकते असे कारण देत  किनारा रस्ता प्रकल्प आणि मुंबई महापालिकेच्या जी दक्षिण विभागाने मनाई केली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

वरळीसह लोअर परळ आदी भागांतील गणेश मंडळांमध्ये महापालिकेच्या या निर्णयाने नाराजी पसरली आहे. दुसरीकडे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनेही या निर्णयाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने पालिकेच्या या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. मुंबई महापालिकेने गणेश भक्तांना विसर्जनासाठी दुसरा पर्याय द्यावा, नाहीतर दहा फुटांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन गणेश घाटातच करु, असा इशारा समितीने दिला आहे.

मरिन ड्राइव्ह ते प्रियदर्शनी पार्क पहिला टप्पा, प्रियदर्शनी पार्क ते लोग्रो नाला दुसरा टप्पा आणि लोग्रो नाला ते वरळी सी लिंक अशा तीन टप्प्यांत मुंबई किनारा मार्गाचे काम सध्या सुरु आहे. यातल्या दुसऱ्या टप्प्यातील वरळीतील गणेश घाट येथील 180 मीटर लांबीच्या पुलाच्या स्लॅबचे काम सुरू आहे. त्यामुळे अनेक यंत्रे समुद्रात आहेत. त्यामुळे विसर्जनानंतर दहा फूट आणि त्यापेक्षा उंच मूर्ती भरतीमुळे या यंत्रापर्यंत जाऊ शकतात. तसेच पुलाच्या कामाला देखील धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. 

दुसरीकडे, वरळी, लोअर परळ भागातील छोट्या-मोठ्या सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन वरळीतील गणेश घाटात होते. मात्र, यंदा बंदी घातल्याने गणेश मंडळांना गणेश घाटात विसर्जन करता येणार नाहीये. त्यामुळे वरळी, लोअर परळ भागांतील गणेश मंडळांसमोर समस्याच निर्माण झाली आहे. यामुळे या परिसरातील मोठ्या गणेश मंडळांना विसर्जनासाठी गिरगाव चौपाटी भागात जावे लागेल. त्यामुळे गिरगाव चौपाटीवर ताण येण्याची शक्यता आहे.

या निर्णयासंदर्भात गेल्या शुक्रवारी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती आणि सार्वजनिक गणेशमंडळांच्या बैठकही पार पडली. यावेळी दहा फुटांपर्यंतच्याच गणेशमूर्तींच्या विसर्जनास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली होती. त्यामुळे वरळीत विसर्जनासाठी पर्याय द्यावा, अन्यथा त्याच ठिकाणी दहा फुटांपेक्षा गणपतींचे विसर्जन केले जाईल, असे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरेश दहिबाकर यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान,  विसर्जनाला मनाई केलेली नाही. मात्र, दहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या मूर्तींचे विसर्जन होऊ शकते, असे मुंबई किनारा मार्ग प्रकल्पाचे प्रमुख अभियंता मंतय्या स्वामी यांनी स्पष्ट केले आहे.