Crime News : मुंबई पोलीस दलातील पोलीस सहआयुक्तांना (Joint Commissioner) आलेल्या एका फोनने मुंबई पोलिसांची (Mumbai Police) झोप उडवली आहे. सह पोलीस आयुक्तांना सोमवारी पहाटे दोनच्या सुमारास एक निनावी नंबरवरुन फोन आला होता. फोनवरील व्यक्तीने स्वत:चे नाव यशवंत माने सांगत मीरा-भाईदरमध्ये (mira bhayandar) बॉम्ब स्फोट (Bomb Blast) होणार असल्याची माहिती दिली. तसेच तात्काळ तिथे पोलीस पाठवा असे सांगितले.
सह पोलीस आयुक्तांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने शिवीगाळ केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सह आयुक्तांनी याबाबत मुख्य नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. मुख्य नियंत्रण कक्षाकडून याबाबतची माहिती मिरा भाईंदर येथील पोलीस नियंत्रण कक्षाला दिली असून पोलिस अधित तपास करत आहेत.
गुगलचे ऑफिस बॉम्बने उडवून देण्याची धमकी
दुसरीकडे पुण्यातील गुगलचे ऑफिस बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्याने एकाला अटक करण्यात आली आहे. मुंबईतील बीकेसीच्या गुगल इंडियाच्या कार्यालयात रविवारी हैद्राबादमधील एका व्यक्तीने फोन करून गुगलच्या पुण्याच्या गुगल ऑफिसमध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली होती. यानंतर बीकेसी पोलिसांनी हैद्राबाद येथील पणयम बाबू शिवानंद नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.
नेमकं काय झालं?
पुण्यातील मुंढवा परिसरातील पुनावाला इमारतीमध्ये शेवटच्या मजल्यावर गुगलचे ऑफिस आहे. दोन महिन्यांपूर्वीच हे ऑफिस सुरु करण्यात आले होते. मुंबईतल्या गुगलच्या कार्यालयात अज्ञात व्यक्तीने फोन करुन पुण्यातील गुगलच्या ऑफिसखाली बॉम्ब ठेवल्याची माहिती देण्यात आली होती. मुंबईच्या गुगल ऑफिसने पुणे पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर मुंढवा पोलिसांनी तात्काळ गुगलच्या इमारतीमध्ये जाऊन तपास सुरु केला. मात्र तपासामध्ये कोणतीही बॉम्बसदृश्य वस्तू आढळली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.