मुंबई : पुण्यात हनुमान जयंतीच्या निमित्ताने महाआरती केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी 5 जून रोजी माझ्या सर्व सहकाऱ्यांसह अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली आहे. तसंच आपण सर्वांनी त्यासाठी आमच्या सोबत दर्शनाला यावं. अशी विनंतीही राज ठाकरे यांनी केली आहे.
संजय राऊत यांचा टोला
राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांचं नाव न घेता टोला लगावला. रणांगणावर आम्ही होतो, आता मंदिर उभं राहतंय, आता प्रसाद मिळतोय काही लोकं प्रसादाला जातात आम्ही रणांगणावर गेलो असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
अयोध्या सगळ्यांची आहे, प्रभू श्री राम सर्वांचे आहेत. जर कोणाला इच्छा झाली असेल जाण्याची तर त्यांनी नक्कीच जाऊन प्रभू श्री रामाचं दर्शन घेतलं पाहिजे. अयोध्येवर किंवा प्रभू श्री रामावर कोणाचाही हक्क नाही. प्रभू श्रीराम हे सर्व जाती धर्मियांचे आहेत. आता तिथे भव्य राममंदिर उभं राहतंय.
एक फार मोठा संघर्ष त्यासाठी झाला, लढा झाला आणि शिवसेनेला अभिमान आहे, की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण शिवसेना अयोध्येच्या राम मंदिराच्या लढ्यात प्रत्यक्ष रणभूमीवर काम करत होती, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची तिथली परिस्थिती पाहून तारीख ठरवू, आमची राजकीय यात्रा नाहिए. गेल्या वर्षभरापासून आमची योजना आहे. पण कोव्हिड काळामुळे जाता आलं नव्हतं असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं
हिंदु समाजातील ओवैसी
उत्तर प्रदेशमध्ये निवडणूका जिंकण्यासाठी भाजपने ज्या प्रकारे औवेसी आणि त्यांच्या एमआयएमचा वापर केला त्याच पद्धतीने महाराष्ट्रात नवहिंदुत्ववादी ओवैसी आहे, हिंदु समाजात काही ओवैसी निर्माण करण्यात आलेले आहेत. त्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून महाराष्ट्रात फूट पाडण्याची, दंगली घडवण्याची, धार्मिक तणाव निर्माण करण्याचे प्रयोग सुरु झालेले आहेत अशी टीका संजय राऊत यांनी केली.
देशभरात दंगलीचा व्यापक कट आहे, जे दिल्लीत घडलं ते महाराष्ट्रात घडवण्याचा प्रयत्न सुरु आहे तो यशस्वी होणार नाही असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.