Mumbai News : जुलै महिन्याच्या अखेरपासूनच मुंबईमध्ये पावसानं उसंत घेतली आणि शहरातील तापमानवाढीला आणखी एक निमित्तच मिळालं. जून- जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळं मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये तापमानाच काही अंशी घट झाल्यामुळं हवेतही हलका गारवा जाणवू लागला होता. पण, अचानकच पावसानं दडी मारल्यामुळं पुन्हा एकदा उकाडा वाढला आणि शहराला असणारा धोकाही.
सातत्यानं होणाऱ्या हवामानातील या बदलांमुळं मुंबईत साथीच्या आजारांचा धोका आणखी वाढला असून, प्रशासनानंही याबाबत चिंता व्यक्त केली आहे. पालिका प्रशासनाच्या वतीनं समोर आलेल्या माहितीनुसार मुंबई शहरात 14096 ठिकाणी डेंग्यू पसरावणारा एडिस डास, तर 2426 ठिकाणी मलेरिया पसरवणारा अनोफिलीस डास आढळला आहे. घरोघरी पालिकेच्या प्रतिनिधींनी केलेल्या निरीक्षणांतून ही आकडेवारी समोर आली आहे.
मागील दोन आठवड्यांपासून मुंबईत लेप्टोचे 172 तर, स्वाइन फ्लूचे 119 रुग्ण आढळल्यामुळं चिंतेत आणखी भर पडली आहे. शहरातील नागरिकांमध्ये साथीच्या आजारांचा हा प्रादुर्भाव पाहता काळजी घेण्याचं आवाहन पालिका प्रशासनानं केलं आहे. साथीच्या रोगाची कोणतीही लक्षणं दिसल्यास पालिका रुग्णालयांतील किंवा खासगी डॉक्टरांशी संपर्क साधत उपचार घ्यावेत अशाची सूचना आणि आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे. सध्या शहरात आजार पसरवणाऱ्या डासांचा सुळसुळाट झाल्यामुळं कीटकनाशक विभागाकडूनही पावसाळय़ाच्या पार्श्वभूमीवर धुम्र फवारणी मोहीम राबवण्यात येत आहे.
शहरात सध्या साथीच्या आजारांचा फैलाव पाहता रुग्णांसाठी प्रमुख आणि उपनगरीय रुग्णालयात तीन हजार बेड तैनात ठेवण्यात आले आहेत. अधिकृ आकडेवारीनुसार यामध्ये उपनगरीय रुग्णालयात विशेष 500 बेडही तैनात असल्याची माहिती समोर येत आहे. सध्याची परिस्थिती पाहता या रुग्णालयांमध्ये सायंकाळी ओपीडी सायंकाळी 4 ते 6 ओपीडीही सुरू ठेवण्यात येत आहे.
दैनंदिन जीवनात कळत नकळत अनेकदा साथीचे आजार पसरवणारे डास मानवी संपर्कात येऊन त्यामुळं अडचणीत आणखी भर पडते. अशा परिस्थितीत आजार टाळण्यासाठी घर आणि घरालगतचा परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साचू देऊ नये, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतंही औषध घेऊ नये, गरज असल्यास पालिकेच्या दवाखान्यात संपर्क करावा, अशा सूचना पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आल्या आहेत. याशिवाय मास्क वापरावा, शिंकताना आणि खोकताना तोंड झाकावं, उघड्यावरील अन्न खाणं टाळण्यासमवेत पाणी उकळून प्यावं, हात आणि शरीराची स्वच्छता ठेवावी, शक्यतो गर्दीत जाणं टाळावं हे सोपे उपाय आणि सवयी साथीच्या आजारांपासून दूर राहण्यास तुमची मदत करतील.