Maharashtra Weather News : राज्यात सध्या पावसाचे दिवस सुरू असले तरीही काही भागांमधून मात्र पावसानं काढता पाय घेतल्यामुळं चांगचील तापमानवाढ होण्यास सुरूवात झाली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार हे चित्र ऑगस्टच्या अखेरपर्यंत पाहायला मिळणार असून सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाला पुन्हा सुरूवात होणार आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार मुंबईत पुढील काही दिवस हलक्या सरींची शक्यता असून, राज्यात मात्र सर्वत्र पावसाने उघडीप दिली आहे. जुलैच्या अखेरच्या आठवड्यापासून पावसाचं प्रमाण कमी होत गेलं आणि ऑगस्टमध्ये त्यानं दडीच मारली. पण, आता मात्र मुंबईत पावसाच्या ढगांची पुन्हा दाटी होताना दिसत आहे.
इथं पावसाची रिमझिम अधूमधून सुरू असतानाच तिथं पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पुन्हा एकदा उकाडा मात्र वाढला आहे. कोकण किनारपट्टी क्षेत्र आणि राज्याच्या इतर भागांमध्येही हवेतील आर्द्रतेचं प्रमाण वाढल्यामुळं अनेक भागांमध्ये उकाडा असह्य होताना दिसत आहे. हेच चित्र पुढील काही दिवस मुंबई ठाण्यासह पालघर भागातही दिसणार असून, इथंही पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
सध्याच्या घडीला मध्य भारतापासून केरळपर्यंत मान्सूनचा प्रभाव असणारा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असला तरीही तो वाऱ्यांच्या दिशेमुळं प्रभावित होताना दिसत आहे. परिणामी हवामानात हे बदल होताना दिसत आहेत. हवामानातील या बदलांचे सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रासह उर्वरित देशातही दिसून येत आहेत.
काही दिवसांपासून उत्तर भारतामध्ये थैमान घालणाऱ्या पावसानं आता या राज्यांमध्येही उसंत घेतलेली असली तरीही क्वचितप्रसंगी इथं हवामानात होणारे क्षणिक बदल धडकी भरवून जात आहेत. इतकंच नव्हे, तर या भागांमध्येही तापमानाच होणारे चढ- उतार चिंतेत भर टाकचत आहेत. स्कायमेट या खासगी हवामान संस्थेच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये ओडिशा, कर्नाटकचा किनारपट्टी भाग, दक्षिण केरळ आणि तेलंगणा इथं पावसाच्या सरी बरसतील. तर, महाराष्ट्रात गोवा आणि कोकण किनारपट्टीवर ढगांची दाटी पाहायला मिळेल.