Mumbai AIQ : मुंबई गुदमरतेय! 'या' गर्दीच्या ठिकाणची हवा 'वाईट'; नागरिक घेताहेत आजारपणाचा श्वास

Mumbai News : बापरे... मुंबईतील परिस्थिती इतकी वाईट? शहरातील हवेची गुणवत्ता नेमकी किती खालावली? समोर आलेली आकडेवारी चिंता वाढवणारी...   

सायली पाटील | Updated: Nov 12, 2024, 10:56 AM IST
Mumbai AIQ : मुंबई गुदमरतेय! 'या' गर्दीच्या ठिकाणची हवा 'वाईट'; नागरिक घेताहेत आजारपणाचा श्वास  title=
Mumbai news City air quality marked very poor creating health issues

Mumbai Air Quality: ऑक्टोबर महिन्याच्या अखेरच्या काही दिवसांपासूनच मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये वातावरणातील दृश्यमानता काही अंशांनी घटल्याचं पाहायला मिळालं. निमित्त होतं ते म्हणजे हवेतील धुरक्यांच्या वाढलेल्या प्रमाणाचं. ही परिस्थिती अद्यापही सुधारली नसून, शहरातील काही भागांमध्ये हवेची गुणवत्ता इतकी खालावली आहे, की त्याची गणती 'वाईट' श्रेणीमध्ये केली जात आहे. समीर ॲपच्या नोंदीनुसार शहरातील हवेचा दर्जा काही दिवसांपासून ‘मध्यम’ श्रेणीतही नोंदवला गेला. 

मुंबईतील कुलाबा, नेव्ही नगर या भागांमघ्ये सोमवारी सायंकाळच्या सुमारास हवेच्या गुणवत्तेची 'वाईट' नोंद करण्यात आली. या भागांमध्ये हवेचा गुणवत्ता निर्देशांक 237 इतका नोंदवला गेला. तर, भायखळा, वरळी, वांद्रे – कुर्ला संकुल, शिवडी आणि मालाड परिसरातील हवा ‘मध्यम’ असल्याची नोंद करण्यात आली. दक्षिण मुंबईतील या ठिकाणांसोबतच देवनार, कांदिवली परिसरातही हवेची गुणवत्ता ढासळल्यामुळं त्याची नोंद ‘वाईट’ श्रेणीत करण्यात आली आहे. इथं हवेचा गुणवत्ता निर्देशांक अनुक्रमे 246 इतका होता. 

मागील काही दिवसांमध्ये वाऱ्याचा मंदावलेला वेग, त्यामुळं हवेत तरंगत राहणारे धुलीकण ही संपूर्ण परिस्थिती अतिशय वाईट वळणावर पोहोचली आहे. शहरात धुलीकणांनी धोक्याची पातळी गाठल्यामुळं हवेचा दर्जा सातत्यानं खालावताना दिसत आहे. हवेचील धुलीकण हे पीएम 10 च्या तुलनेत सूक्ष्म असल्यामुळं शरारीत अगदी सहज प्रवेश करतात. त्यामुळे ते आरोग्यास घातक ठरतात. 

हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : राज्यात किमान तापमानाचा आकडा 12 अंशांवर; कुठे पडलीये इतकी थंडी, कुठे चक्रीवादळाचं सावट 

हवेतील धुलीकणांमध्ये कार्बन डायऑक्साईड, कार्बन सल्फेट, सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइडचं प्रमाण अतिशय झपाट्यानं वाढत असून, ही धोक्याची बाब असल्याचं आता निष्पन्न होत आहे. ज्यामुळं शहरात श्वसन आणि त्वचेशी संबंधित आजार बळावत असून, त्याशिवाय श्वसन विकारात दमा, न्युमोनिया, फुफ्फुसाचा कर्करोग, श्वसन नलिकेला सूज, दम लागणे तसेच त्वचा कोरडी राहणे, फाटणे, लाल होणे, खाज येणे अशा समस्यांचं प्रमाण वाढल्याचं सांगितलं जात आहे.