Mumbai News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मोठी घोषणा करत मुंबईतील वांद्रे-वर्सोवा सी लिंकचे (Bandra Varsova Sea Link) नाव बदलले आहे. यापुढे वांद्रे-वर्सोवा सी लिंक वीर सावरकर सेतू म्हणून ओळखला जाणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून याची चर्चा सुरु होती. तसेच राज्य सरकार वांद्रे-वर्सोवा लिंकचे नाव बदलणार असल्याचे म्हटलं जात होते. अशातच आता वीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या 140 व्या जयंतीनिमित्तच वांद्रे-वर्सोवा सी लिंकला नवीन नाव देण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत घोषणा केली आहे.
याबाबत माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, यापुढे वांद्रे-वर्सोवा सी लिंक वीर सावरकर सेतू म्हणून ओळखला जाईल. विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना वीर सावरकर शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. त्यामुळे आता वांद्रे वरळी सी लिंक आता वीर सावरकर सेतू म्हणून ओळखला जाणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील कोस्टल रोडला धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज, तर वांद्रे-वर्सोवा सी-लिंकला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि मुंबई ट्रान्सहार्बर लिंकला (एमटीएचएल)ला भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी पत्राद्वारे केली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी याची घोषणा केली आहे.
मुंबईतील कोस्टल रोडला आपल्या सर्वांचे आदर्श धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जाहीर केला, त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार!
16 मार्च 2023 रोजी यासंदर्भातील मागणी एका पत्रातून मी त्यांच्याकडे केली होती आणि आज… https://t.co/QvApZi6JSZ pic.twitter.com/XGCtCpcblg— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 14, 2023
दरम्यान, राष्ट्रीय राजकारणाबरोबरच महाराष्ट्राच्या राजकारणातही सावरकरांना महत्त्वाचे स्थान आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून देशातील राजकारण तापलेलं दिसत आहे. यापूर्वी भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे देशभरात खळबळ उडाली होती. त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणातही दिसून आला होता. राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावरकर गौरव यात्रा काढणार असल्याची घोषणा केली होती. त्याची सुरुवात ठाण्यातून झाली. राज्यातील 288 जागांवर ही यात्रा काढण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली होती. यासोबत राज्यभरात त्याचे आयोजन करण्यात आले होते.
वीर सावरकर जयंतीदिवशीच नवीन संसद भवनाचे उद्घाटन
दुसरीकडे संसद भवनाचे रविवारी 28 मे रोजी उद्घाटन झाले. विरोधी पक्षांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभात सहभागी होण्यास नकार दिला होता. विरोधी पक्षांनी म्हटले की नवीन संसद भवनाची गरज होती का? दुसरीकडे काही पक्षांनी संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हावे, असे म्हटले आहे. नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावेळी अनेक ब्राह्मण पुजारी संसद भवनात पोहोचले होते. यावेळी त्यांनी पंतप्रधआन मोदींना राजदंड सेंगोलही दिला. लोकसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ पंतप्रधान मोदींनी सेंगोल बसवले आहे.