मुंबई महापौर निवडणूक : सेनेकडून किशोरी पेडणेकर यांचा अर्ज

मुंबई महापौर पदासाठी शिवसेनेकडून किशोरी पेडणेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे 

Updated: Nov 18, 2019, 06:15 PM IST
मुंबई महापौर निवडणूक : सेनेकडून किशोरी पेडणेकर यांचा अर्ज title=

मुंबई : महापौर पदासाठी शिवसेनेकडून किशोरी पेडणेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मुंबई महापौर निवडणुकीसाठी सेनेने किशोरी पेडणेकर यांना रिंगणात उतरविले असून उपमहापौर पदासाठी अॅड. सुहास वाडकर यांना संधी देण्यात आली आहे. आज दोन्ही उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, भाजपकडून या निवडणुकीत आपले उमेदवार दिलेले नाहीत. संख्याबळ आमच्याकडे नसल्याने आम्ही ही निवडणूक लढणार नाही, असे भाजपकडून जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, विरोधकांकडून कोणाचेही अर्ज आलेले नाहीत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

'मुंबई महापौर पदासाठी भाजपचा उमेदवार नाही'

राज्यातील २७ महापालिका महापौर पदाच्या पहिल्या अडीच वर्षांसाठीची मुदत २१ नोव्हेंबरला संपत आहे. त्यासाठी ही निवडणूक होत आहे. मुंबई पालिकेत सलग दुसऱ्यावेळी खुल्या प्रवर्गाचे आरक्षण पडले आहे. त्यामुळे पालिकेच्या सर्व २२२ नगरसेवकांना महापौरपदासाठी अर्ज करण्याची संधी होती. गेल्या पंचवीस वर्षांपासून मुंबई पालिकेवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. त्यातच या निवडणुकीत भाजपने आपला उमेदवार न दिल्याने शिवसेनेचा मार्ग मोकळा झाला आहे.

तसेच अन्य पक्षांकडूनही महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज न आल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. २२ नोव्हेंबरला महापौर आणि उपमहापौर निवडीची अधिकृत घोषणा होणार आहे.