कृष्णात पाटील, मुंबई : यंदाच्या वर्षी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक विसर्जन स्थळांवर म्हणजे समुद्र किंवा तलावावर नागरिकांना थेट गणेश विसर्जन करता येणार नाही आहे. अशा ठिकाणी मूर्ती संकलनाची व्यवस्था महापालिकेकडून केली जाणार आहे.
नैसर्गिक किंवा कृत्रीम विसर्जन स्थळे आहेत तेथे १ ते २ किमीच्या परिघातील नागरिकांनीच गणेश विसर्जनासाठी जाता येणार आहे. ज्या नागरिकांना जवळचे विसर्जन स्थळ नसेल त्यांनी महापालिकेच्या मूर्तीसंकलन केंद्रात गणेशमूर्ती द्यावी लागणार आहे. प्रत्येक विभागात किमान ७-८ मूर्ती संकलन केंद्रे सुरु केली जाणार आहेत. ही केंद्रे मैदान, सार्वजनिक गणेश मंडळांचे मंडप अशा ठिकाणी असतील.
विसर्जनापूर्वीची पूजा, आरती आणि इतर विधी घरीच पूर्ण करण्याचं आवाहन महापालिकेने केलं आहे. ज्यामुळे विसर्जनस्थळी गर्दी टाळता येईल.
यंदाच्या वर्षी गणेश आगमन हे गणेश चतुर्थीच्या ३-४ दिवस आधी करण्याचे आवाहन देखील महापालिकेने केले आहे. आगमनावेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी महापालिकेनं हे आवाहन केले आहे.
कंटेंटमेंट झोन मध्ये तात्पुरती विसर्जन स्थळे तयार करण्याचं आवाहन महापालिकेने केले आहे. प्रत्येक विभागात फिरती विसर्जन स्थळे देखील असणार आहेत.