Mumbai Monorail: मुंबई मेट्रोप्रमाणेच मोनोरेलनेही नियमित प्रवास करणारे नागरिक आहेत. मात्र मोनो रेल्वेच्या फेऱ्या कमी असल्याने कधी कधी प्रवाशांना ताटकळत राहावे लागते. आता प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ऑगस्ट 2025 पर्यं मोनोरेलच्या फेऱ्या वाढवण्यात येण्याची शक्यता आहे. सध्या आठपैकी सहा ट्रेन चालवल्या जात आहेत. यात अंदाजे 16,500 नागरिक प्रवास करतात. चेंबूर, वडाळा ते जेकब सर्कल या स्थानकातून मोठ्या प्रमाणात नागरिक प्रवास करतात.
मोनोरेल प्रवाशांच्या सेवेत दाखल होऊन एक दशक उलटून गेले. मात्र, सुरुवातीपासूनच मोनोरेलच्या अडचणी काही संपत नाहीत. गाड्यांच्या कमी फेऱ्या, तांत्रिक बिघाड, कमी प्रतिसाद यामुळं मोनोकडे अनेक नागरिक पाठ फिरवतात. सध्या फक्त सहा ट्रेन चालवल्या जात असून दोन ट्रेनच्यामध्ये 15 मिनिटांचे अंतर आहे तर, शनिवार-रविवारी 15 मिनिटांपर्यंतचे अंतर आहे. त्यामुळं प्रवाशांची एक ट्रेन चुकली तर दुसऱ्या ट्रेनसाठी वाट पाहावी लागते.
प्रशासनाने आता मोनोरेल अपग्रेड करण्याचा विचार केला आहे. येत्या काही दिवसांत मोनोट्रेनची संख्या 8वरुन 18 पर्यंत नेण्याचा विचार आहे. त्यातील 12 ट्रेन दररोज चालवल्या जातील तर 2 ट्रेन राखीव म्हणून आणि चार ट्रेन मेटेनन्ससाठी ठेवण्यात येतील. त्यातबरोबर,कंपोटनट रिप्लेसमेंट, इंटिरियर अपग्रेड, ट्रेनच्या डब्याला नवीन टायर आणि जॉइंट्स बसवण्यात येतील, कंट्रोल सिस्टम बसवण्यात येईल. नवीन सिस्टम ही ट्रेनच्या तांत्रिक बाबींवर लक्ष ठेवून असेल.
मोनो रेलचे नवीन रेक बेंगळुरु येथील मेधा सुर्वो ड्राइव्ह हैदराबाद येथे आणण्यात आली आहे. तिसरी रेक 10 जानेवारी 2025 मध्ये येण्याची शक्यता आहे. चौथी आणि पाचवी रेक फेब्रुवारीत येण्याची शक्यता आहे. तर उर्वरित चार जून 2025पर्यंत येऊ शरतात. एप्रिल 2025पर्यंत चार रेक आणि आठ अपग्रेड ट्रेन सज्ज असतील. जुलै 2025मध्ये मोनोरेल मेट्रो 3 ला कनेक्ट होणार आहे. मोनोरेलच्या जेकब सर्कल येथे मेट्रो 3 कनेक्ट होणार आहे. मेट्रो 3ला मोनो कनेक्ट केल्यानंतर प्रवाशांना थेट कनेक्टिव्हीटी मिळणार आहे.