Mumbai Metro : मुंबईतील मेट्रो 2ए आणि मेट्रो 7 चे तिकीट दर 10 ते 50 रुपयांच्या दरम्यान असेल असं MMRDA नं जाहीर केलं आहे. गुढीपाडव्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते या दोन मेट्रो (Mumbai Metro) मार्गांना हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. दहिसर पूर्व ते डहाणूकर वाडी हा मेट्रो 2ए मार्ग आणि आरे ते दहिसर पूर्व मेट्रो 7 मुळे पश्चिम द्रुतगती मार्ग, एस व्ही रोड, लिंकिंग रोडवरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. सुरूवातीला नव्या मार्गांवर सकाळी 6 ते रात्री 10पर्यंत सुमारे 150 फेऱ्या होतील आणि त्यातून दररोज तीन ते सव्वातीन लाख लोक प्रवास करण्याची अपेक्षा आहे.
एमएमआरडीएचे आयुक्त श्रीनिवास यांनी पत्रकार परिषद घेत आज ही माहिती दिली. मेट्रो 2 ए मध्ये एकूण 9 स्थानक सुरु होणार आहेत. मेट्रो 7 मधील एकूण 10 स्थानक सुरु होणार आहेत. ज्यावर सुरुवातीला सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत मेट्रो धावणार आहे. या मेट्रो ट्रेनला सहा डबे असतील. ज्यामधून 2280 प्रवासी प्रवास करु शकतील.
दुसरीकडे मेट्रो 3 चे काम पूर्ण होण्यास दोन ते अडीच वर्षे लागण्याची शक्यता ही MMRDA चे आयुक्त श्रीनिवास यांनी वर्तवली आहे. त्यामुळे मुंबईकरांना यासाठी आणखी थोडी प्रतिक्षा करावी लागणार आहे.