प्रशांत अंकुशराव, झी २४ तास, मुंबई : अभिनेता सलमान खानला (Salman Khan) मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दणका दिला आहे. सलमान खानची अंतरीम दिलासा याचिका मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळली आहे. पनवेलच्या फार्महाऊस (Panvel Farmhouse) शेजारी राहणारे अनिवासी भारतीय केतन कक्कर (Ketan Kakkar) यांच्या विरोधात याचिका करण्यात आली होती.
पनवेलच्या फार्म हाऊसबाबत कक्कर यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्ट हटवण्याची मागणी सलमान खानने केली होती. सलमान खानच्या शेजारी केतन कक्कर यांची प्रॉपर्टी आहे. सलमानने अवैधरीत्या बांधकाम आणि अतिक्रमण केल्याची कक्कर यांची तक्रार आहे.
काही दिवसांपूर्वी सलमान खानच्या शेजाऱ्याने त्याच्यावर गंभीर आरोप केले होते. आपली प्रतिमा खराब केल्याबद्दल अभिनेत्याने त्याच्या शेजाऱ्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता. त्यानंतर मुंबईतील सत्र न्यायालयाने अभिनेता सलमान खानचा एनआरआय शेजारी केतन कक्कर आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विरुद्ध मानहानीच्या दाव्यात 'गॅग ऑर्डर'साठीची अंतरिम याचिका फेटाळून लावली आहे. पनवेलच्या फार्महाऊसवर केतन कक्करने अभिनेत्यावर केलेले सर्व आरोप खरे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
आपली बदनामी करण्यासाठी आपल्यावर हे आरोप लावण्यात आल्याचा दावा सलमान खानने केला होता. केतन कक्करच्या वतीने न्यायालयात सादर करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने हा आदेश दिला आहे. सलमान खानने केतनला त्याच्या जमिनीवर येण्यापासून रोखल्याचे पुराव्यावरून दिसून आले.
या प्रकरणाची सुनावणी आणि निर्णय येईपर्यंत केतन कक्करने सोशल मीडियावर सलमान खानबद्दल अपमानास्पद काहीही पोस्ट करू नये, अशी विनंती सलमान खानने अलीकडेच न्यायालयाला केली होती. आपल्यावरील आरोप खोटे आणि निराधार असल्याचे त्यांनी म्हटले होते.