लोका सांगे ब्रह्मज्ञान.... महापौरच गाडी नो पार्किंगमध्ये लावतात तेव्हा...

अनधिकृरित्या पार्किंग केल्यास ५ हजार ते १५ हजार रुपयांचा दंड वसूल केला जात आहे.

Updated: Jul 15, 2019, 03:49 PM IST
लोका सांगे ब्रह्मज्ञान.... महापौरच गाडी नो पार्किंगमध्ये लावतात तेव्हा... title=

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुंबई महानगरपालिकेकडून रस्त्यावर वाहनांच्या अनधिकृत पार्किंगविरोधात जोरदार मोहीम हाती घेण्यात आली आहे. अवघ्या काही दिवसांमध्ये दंडाच्या रक्कमेतून पालिकेने कोट्यवधी रुपयेही वसूल केले. मात्र, या नियमांना मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनीच हरताळ फासल्याचे समोर आले आहे. 

महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची गाडी विलेपार्ले येथील मालवणी आस्वाद हॉटेलच्या बाहेर नो पार्किंग क्षेत्रात उभी करण्यात आल्याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तरीही पालिकेने महाडेश्वर यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे अनेक मुंबईकरांनी पालिकेच्या या दुटप्पी वर्तनावर बोट ठेवत टीका केली आहे. 

महापालिकेकडून काही दिवसांपूर्वी शहरात नवे पार्किंग धोरण लागू करण्यात आले होते. त्यानुसार, वाहनतळाच्या ५०० मीटर क्षेत्रात वाहन अनधिकृरित्या पार्किंग केल्यास ५ हजार ते १५ हजार रुपयांचा दंड वसूल केला जात आहे. या नियमानुसार महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनीही १० हजारांचा दंड देणे लागू आहे. मात्र, पालिकेने अद्याप तशी कोणतीही कारवाई केलेली नाही. 

दरम्यान, महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. माझी गाडी नो पार्किंग क्षेत्रात पार्क केली नव्हती. केवळ मी गाडीतून उतरण्यापुरता गाडी त्याठिकाणी थांबली होती. त्यामुळे माझ्याकडून नियमाचे कोणतेही उल्लंघन झालेले नाही. यानंतरही महापालिकेकडून तशी पावती आलीच तर मी दंड भरायला तयार असल्याचे विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले. 

महानगरपालिकेने नव्या नियमाची अंमलबजावणी केल्यानंतर नागरिकांना वाहने पार्क करण्यासाठी शहरात १४६ ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या नियमांचा भंग केल्यास दंड आकारला जात आहे. दंड न भरल्यास वाहन'टोइंग मशीन'ने उचलून नेले जाईल. ३० दिवसांच्या आत सोडवून न नेल्यास ती वाहने बेवारस असल्याचे समजून त्यांची लिलावात विक्री केली जाईल, असेही पालिकेकडून सांगण्यात आले आहे.