'2019 नंतर भाजपचे पुरुष हैराण होते, आता त्यांच्या घरातल्या महिलाही त्रस्त'

घटस्फोटाच्या वक्तव्यानंतर अमृता फडणवीस यांना किशोरी पेडणेकर यांचं जशात तसं उत्तर  

Updated: Feb 4, 2022, 05:08 PM IST
'2019 नंतर भाजपचे पुरुष हैराण होते, आता त्यांच्या घरातल्या महिलाही त्रस्त' title=

मुंबई : मुंबईत प्रचंड वाहतुक कोंडी असून मुंबईतली वाहतुक कोंडीमुळे घटस्फोटाचं प्रमाण वाढलं आहे असा दावा अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांनी केला आहे. यावर सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत असून  आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

'तुम्ही विसरुन जा की मी देवेंद्र फडणवीस यांची पत्नी आहे,  मी रोज सामान्य स्त्री सारखी बाहेर पडते.'  असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं होतं. अमृता फडणवीस यांनी हा जावई शोध कुठून लावला, ज्याचं त्याचं क्षेत्र आहे, त्याने त्या क्षेत्रात काम करावं असं टोला किशोरी पेडणेकर यांनी लगावला आहे. 

तसंच, अमृता फडणवीस यांनी सिद्ध करावं की वाहतूक कोंडीमुळे घटस्फोट होत आहेत, असं आवाहन किशोरी पेडणेकर यांनी दिलं आहे. सामान्य स्त्री म्हणून मी बोलते असे त्या म्हणाल्या, मग आम्ही त्यांना कोणत्या भूमिकेत बघायचं, सामान्य स्त्री की माजी मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून, असा टोलाही किशोरी पेडणेकर यांनी लगावला आहे.

असे जावई शोध करून मुंबई किंवा महाराष्ट्राला मलिन करण्याचा प्रयत्न करू नये, थोडं जरा सामान्य स्त्री म्हणून केंद्रातही बोला, केंद्रातून राज्याला काय फायदा होतो त्यावरही त्यांनी बोलावं, असंही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. आम्ही करतो ते सूड आणि तुम्ही करता ते न्यायिक असं प्रत्युत्तर पेडणेकर यांनी दिलं आहे.

2019 ला जे राजकीय बदल झाले त्यावरून मला वाटत आधी भाजपचे पुरुषच हैराण होते. पण आता घरच्या महिला देखील हैराण झाल्या आहेत, असा टोला किशोरी पेडणेकर यांनी लगावला आहे. जिथे प्रबोधन करताय करा किंवा मॉडेलिंग सिनेमा क्षेत्र याविषयी बोलणं ठीक आहे असा सल्लाही किशोरी पेडणेकर यांनी अमृता फडणवीस यांना दिला आहे.