मुंबई : भाजप नेते आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) सोशल मीडियावर चांगल्याच अॅक्टिव्ह असतात. त्यांच्या अनेक ट्विटवर चर्चा होत असते. आता त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे त्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत.
अमृता फडणवीस यांचा अजब दावा
मुंबईत प्रचंड वाहतुक कोंडी असून मुंबईतल वाहतुक कोंडीमुळे घटस्फोटाचं प्रमाण वाढलं आहे असा दावा अमृता फडणवीस यांनी केला आहे. भाजपातर्फे मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कॅन्सरमुक्त अभियानाचा शुभारंभ अमृता फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी त्यांनी मुंबईतल्या रस्त्यांवरुन ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
'तुम्ही विसरुन जा की मी देवेंद्र फडणवीस यांची पत्नी आहे, मी जेव्हा बाहेर पडते, तेव्हा मला दिसतं की किती ट्रॅफीक आहे. खड्ड्यांनी किती त्रास होतो, मी रोज सामान्य स्त्री सारखी बाहेर पडते.'
आज मुंबई ट्रॅफिक जाममुळे किती टक्के घटस्फोट होतात, हे तुम्हाला माहित आहे का असं सांगत त्यांनी घटस्फोटाचं प्रमाणही सांगितलं. वाहतुक कोंडीमुळे मुंबईत ३ टक्के घटस्फोट होतात, कारण आपण आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही, आणि हे बोलणार नाही तर कसं होणार. असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.
महापौर किशोरी पेडणेकर यांचं प्रत्युत्तर
अमृता फडणवीस यांनी केलेल्या आरोपांना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिलं आहे. मुंबईतील रस्ते गुळगुळीत आहेत, असा दावा आम्ही कधीही केलेला नाही, पण माहिती मिळताच रस्त्यांवरील खड्डे बजुवले जातात, वाहतूक कोंडीमुळे लोकांचे घटस्फोट होतात, हे विधान चुकीचं असल्याचं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.