'मुंबई महापौर पदासाठी भाजपचा उमेदवार नाही'

मुंबई महापालिकेतल्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजप भाग घेणार नाही.

Updated: Nov 18, 2019, 01:28 PM IST
'मुंबई महापौर पदासाठी भाजपचा उमेदवार नाही' title=
संग्रहित छाया

मुंबई : महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीत भाजप भाग घेणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुन्हा शिवसेनेचाच महापौर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपकडे संख्याबळ नसल्याने या निवडणुकीत भाग घेत नसल्याचे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे शिवसेनेचा महापौर निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या शिवसेनेकडे ९४ नगरसेवक आहेत. मात्र, बहुमतासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची मदत घ्यावी लागणार आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेत आम्ही आता तुल्यबळ आहोत. मात्र संख्याबळ नाही. त्यामुळे विरोधी विचारांच्या जीवावर आता उमेदवार उभा करणार नसल्याचे भाजप नेते आशिष शेलार यांनी स्पष्ट केले आहे. मात्र २०२२ मध्ये मुंबईचा महापौर स्वबळावर आणि संख्याबळावरही असणार, असे आशिष शेलारांनी ट्विट केले आहे. 

मुंबई महापालिकेत निवडणूक निकालनंतर भाजप मोठा पक्ष ठरला होता. मात्र, राज्यात युती करण्यासाठी भाजपने मुंबई महापालिकेवरील दावा सोडून शिवसेनेला महापौर पद बहाल केले. त्यानंतर विरोधी पक्षातील नगरसेवकांची फोडाफोडी करण्यात शिवसेना यशस्वी झाली. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ आता भाजपपेक्षा जास्त झाले आहे. आता राज्यात युती तुटल्याने मुंबई महापालिकेत भाजप वचपा काढण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, भाजपने संख्याबळाचे कारण देत या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे ही निवडणूक शिवसेनेसाठी सोपी  झाली आहे.

महाराष्ट्र राज्यात महाशिवआघाडी आकारास येण्याची शक्यता असतानाच मुंबई महापालिकेतही राजकीय समीकरणे वेगाने बदलण्याची चिन्हे आहेत. मुंबईचे नगरसेवक शिवसेनेसोबत आघाडी करण्यास उत्सुक असल्याची माहिती आहे. मुंबईतील काँग्रेस नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा देण्यावर चर्चा झाली.

काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्यास उत्सुक आहे, पण काँग्रेसला शिवसेनेच्या प्रस्तावाची प्रतीक्षा आहे. शिवसेनेनं अजून कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. पण काँग्रेसने पाठिंब्याबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि एकनाथ गायकवाडांना दिलेत.