मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत केलेल्या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सरकार बनवण्याबाबत शिवसेना आणि भाजपला विचारा, असे सांगत पवारांनी पुन्हा गुगली टाकली आहे. शिवसेना - भाजप एकत्र निवडणूक लढली आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेला विचारा, अशी प्रतिक्रिया पवारांनी दिली आहे. पवारांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेणार असल्याचे पवारांनी सांगितले आहे.
महाराष्ट्र राज्यात महाशिवआघाडीचं सरकार स्थापन करण्याबाबत आजपासून हालचालींना वेग येणार आहे. पुण्यात शरद पवारांनी बोलवलेल्या बैठकीत शिवसेनेसोबत जाण्याबाबत राष्ट्रवादीच्या बहुतांश नेत्यांनी सकारात्मक भूमिका मांडली. त्यानंतर आता पवार सोनिया गांधींची भेट घेणार आहेत.
दरम्यान, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आज दिल्लीत होत असलेल्या भेटीकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे. महाराष्ट्रात सध्या सत्तासंघर्षाची कोंडी फुटण्याच्या दृष्टीने, सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यातली आजची भेट महत्त्वाची ठरणार आहे. शिवसेनेसोबत सत्तास्थापन करण्याबाबत राष्ट्रवादी अनुकूल आहे. तर राज्यात शिवसेनेसोबत जाऊन सत्तास्थापन करण्याबाबत काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या अजून चर्चा सुरु आहेत. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि सोनिया गांधी भेटीत चर्चा होऊन, निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे भाजप सरकारच्या काळात मेगाभरती पाहिल्या आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झालेली असताना राष्ट्रवादीत मेरिटवर आमदारांची भरती होणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप आणि अपक्ष मिळून १४ ते १५ आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे सांगितले. या आमदारांना योग्यवेळी पक्षात घेणार असल्याचं ते म्हणाले. भाजपमध्ये गेलेले अनेक नेते राष्ट्रवादीत परतण्यास इच्छुक आहेत. पण भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना परत घेण्याबाबत स्थानिक नेत्यांशी बोलूनच विचार करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले.