मुंबई : लोकलमध्ये मोबाईल चोरट्याने लंपास केला. चोराचा पाठलाग करताना चर्नीरोड स्टेशनजवळ लोकलमधून पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. रविवारी सातच्या वाजण्याच्या सुमारास चर्नीरोड स्थानकात लोकल आली असताना चोरट्याने मोबाईल लांबविला आणि लोकल सुरु होताच उडी मारुन पसार झाला. दरम्यान, आपला मोबाईल मारल्याचे लक्षात येताच तरुणाने त्याला पकडण्यासाठी लोकलमधून उडी मारली. मात्र, तोपर्यंत गाडीने वेग घेतला होता. त्यामुळे त्याचा तोल जावून अपघात झाला.
शकील शेख या प्रवाशाचा चोरट्याने मोबाइल हिसकावून धावत्या लोकलमधून फलाटावर उतरून पळ काढला. शकील याने लोकलमधून उतरून चोरट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत लोकलने वेग पकडला होता. वेगाचा अंदाज न आल्याने फलाट आणि लोकलच्यामध्ये पडून शकील शेख यांचा मृत्यू झाला.