मुंबई: मुंबईत एकीकडे दिवसभर मुसळधार पावसानं दाणादण उडाली आणि त्यानंतर रात्री मालाड इथल्या मालवणी भागात इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. मालवणी भागात रात्री 11 वाजून 10 मिनिटांनी बिल्डींग कोसळली. या अपघातात 11 जण ठार तर 8 जण जखमी आहेत. दुर्दैवानं यामध्ये 2 कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. तर एकातील 9 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
धक्कादायक म्हणजे या इमारतीमधील एका कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 7 मुलांचाही समावेश आहे. डोळ्यादेखत 7 मुलांचा जीव गेल्यानं दोन कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. यात ४ मुली आणि ३ मुलांचा समावेश आहे. मोहम्मद रफी या स्थानिकांचं हे संपूर्ण कुटुंब यात बळी पडलं.
मोहम्मद रफी यांची पत्नी, भाऊ, भावजय आणि परिवारातली 7 मुलं या अपघातात मृत्यूमुखी पडली. हा प्रकार घडला तेव्हा मोहम्मद रफी हे स्वतः दूध खरेदी करण्यासाठी बाहेर गेले होते. त्याच वेळी बिल्डींग कोसळली. डोळ्यादेखत रफी यांचं संपूर्ण कुटुंब मृत्यूमुखी पडलं.
मोहम्मद रफीच्या म्हणण्यानुसार 'मी दूध आणायला गेलो म्हणून मी वाचलो मात्र मी परत आलो त्यावेळी इमारत पूर्ण कोसळली होती. आपलं अख्खं कुटुंब इमारतीखाली गेल्याच्या विचारानं अंगावर काटा आला आणि टाहो फोडला.'
मालाड इमारत दुर्घटनेतील समोर आलेल्या मृतांची नावं
अनिश बानो वय वर्ष- 10
आल्फीश वय वर्ष- 2
रईशा बानो
साहिल सर्फराज सय्यद वय वर्ष-9
अरिफा शेख वय वर्ष- 8
ढिगारा उपसण्याचं काम अद्यापही सुरू आहे. अग्निशमन दलाकडून ढिगाऱ्यात अजूनही शोधकार्य सुरू आहे. ही एक मजली धोकादायक अवस्थेत होती. ही एक मजली अनधिकृत इमारत असल्याची माहिती मिळाली आहे.
या इमारतीवर आणखी दोन मजले चढवण्यात आले होते अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. या बिल्डींगच्या शेजारी असलेली तीन मजली इमारतही धोकादायक स्थितीत आहे. या बिल्डींगमधील रहिवाशांनाही सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू आहे.