Viral Video : लोकलमध्ये चोरी केल्याचा संशय, प्रवाशांची दोन तरुणांना अर्धनग्न करुन मारहाण

मध्य रेल्वे मार्गावरची घटना, भर गर्दीच्या लोकलमध्ये जमावाने दोन तरुणांना अर्धनग्न करुन केली मारहाण, घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Updated: Feb 7, 2023, 02:39 PM IST
Viral Video : लोकलमध्ये चोरी केल्याचा संशय, प्रवाशांची दोन तरुणांना अर्धनग्न करुन मारहाण title=

आतिष भोईर, झी मीडिया, कल्याण : मुंबई लोकलमध्ये (Mumbai Local) जागेवरुन किंवा धक्का लागून भांडण झाल्याच्या घटना वारंवार घडत असतात. अनेक वेळा याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होतात. सध्या सोशल मीडियावर  (Social Media) मुंबईच्या लोकलमधला असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. चोरी करत असल्याच्या संशयावरुन प्रवाशांनी दोन तरुणांना अक्षरश: अर्धनग्न करुन मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. एका प्रवाशाने आपल्या मोबाईलमध्ये ही घटना कैद केली असून सोशल मीडियामध्ये व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

काय आहे व्हायरल व्हिडिओत
हा व्हिडिओ कोपर ते डोंबिवली स्थानकादरम्यानचा (Dombivali-Kopar) असल्याचं ट्रेनमध्ये असलेल्या इंडिकेटरवर दिसत आहे. पण हा व्हिडिओ कधीचा आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही. सीएसएमटी ते बदलापूर लोकलमध्ये हे संशयित दोन तरुण चोरी करत असल्याचा प्रवाशांना संशय होता. त्यामुळे प्रवाशांनी या दोघा तरुणांना अर्ध नग्न करत चोप दिला. हे तरुण आपण चोरी केली नसल्याची वारंवार विनवणी करताना व्हिडिओत दिसत आहेत. पण इतर प्रवाशी ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. (2 youths beaten up by passengers in local)

तरुणांचे कपडे उतरवले
व्हिडिओत लोकलमध्ये प्रचंड गर्दी असल्याचं दिसत आहे. चोरी केल्याच्या संशयावरुन काही प्रवाशांनी या दोन तरुणांना आधी शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांना मारहाण सुरु केली. इतक्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी या तरुणांना त्यांचे कपडे उतरवायला लावले. काही प्रवासी हा प्रकार करत असताना इतर प्रवाशांनी बघ्याची भूमिका घेतल्याचं दिसत आहे. दरम्यान हा व्हायरल झालेला व्हिडिओ कल्याण रेल्वे पोलिसांच्या हाती लागला आहे. रेल्वे पोलिसांनी या व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून पुढील तपास सुरू केला आहे.

स्कायवॉकला लटकून तरुणाचा गळफास
दरम्यान, कल्याण रेल्वे स्थानकात आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली. कल्याण स्टेशन परिसरातील स्कायवॉकला (Skywalk) लटकून एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच महात्मा फुले पोलिस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव त्याचा मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. विठ्ठल मिसाळ असे या तरुणाचे नाव असून तो बीड इथला रहिवासी आहे . आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट असून पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान स्टेशन परिसरात घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती.