'उबर'मध्ये महिला पत्रकाराला महिला सहप्रवाशाकडून मारहाण

उबर कॅबमध्ये एका महिला पत्रकाराला सहप्रवासी महिलेनेच मारहाण केल्याची घटना मुंबईतील लोअर परळ भागात घडलीय.

Updated: Jun 26, 2018, 09:14 PM IST

मुंबई : उबर कॅबमध्ये एका महिला पत्रकाराला सहप्रवासी महिलेनेच मारहाण केल्याची घटना मुंबईतील लोअर परळ भागात घडलीय. सोमवारी महिला पत्रकार उष्णोता पॉल यांनी उबर शेअर कॅब बूक केली होती. पॉल यांच्याआधी एक महिला त्या कारमध्ये बसली होती. या महिलेने आधीच कॅब बूक केली होती. तिला लागणारं भाडंही सगळ्यात जास्त होतं. मात्र सगळ्यात जास्त भाडं देऊनही शेवटी उतरावं लागणार हे समजताच ही महिला भडकली आणि उबर चालकाला ओरडू लागली.

यावेळी उष्णोतानं मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता ती महिला उष्णोताला शिवीगाळ देऊ लागली. यावेळी या महिलेने जातीवाचक शिवीगाळ केल्याचं उष्णोता यांनी आपल्या ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटलंय. ही महिला एवढ्यावरच थांबली नाही. तिनं आपले केस उपटले आणि चेहरा तसंच हातावर नखं मारल्याचा आरोपही उष्णोतानं या पोस्टमध्ये केलाय. याप्रकरणी उष्णोता यांनी मुंबईतील ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात या महिलेविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंद केलाय.