पावसात रिक्षा चालकांची मुजोरी, नागरिकांकडून २०० रुपये घेऊन प्रवास

 घाटकोपर ते ठाणे किंवा ऐरोली या प्रवासाठी एका व्यक्तिकडून 200 रुपये मागितले जात आहेत. 

Updated: Jul 2, 2019, 10:07 AM IST
पावसात रिक्षा चालकांची मुजोरी, नागरिकांकडून २०० रुपये घेऊन प्रवास  title=

प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईची तुंबई करणाऱ्या पावसाने रात्रभर बसरत आठवडच्या दुसरा दिवसही मुंबईकरांसाठी जणू सुट्टीचा दिवस घोषित केला...रात्रभर बरसलेल्या पावसानंतर सकाळीही मुंबईत पावसाने हजेरी लावली. तर काळे ढग दाटून आले...मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस सुरु आहे. दादर, लोअर परेल, सायन, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, अंधेरी, कांदीवली, जोगेश्वरी परिसारात जोरदार पाऊसप पडतोय. मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणीच पाणी झालंय. याचा फायदा मुजोर रिक्षा चालकांनी घेतला आहे. रेल्वे सेवा बंद असल्यामुळे मुंबईच्या काही रिक्षाचालकांनी मुंबईकरांना वेठीस धरण्यास सुरुवात केली आहे.

दोनशे रुपयांचा प्रवास 

ठाण्यातून मुंबईच्या दिशेने जाणारी रेल्वेची वाहतूक ठप्प झालेली आहे. त्यामुळे कल्याण वरून ठाण्या पर्यंतच गाड्या धावत आहेत त्यामुळे आज ठाणेकरांनी घरी राहणेच पसंत केलं आहे. रस्ते वाहतूकही मंदावली आहे. घाटकोपर ते ठाणे किंवा ऐरोली या प्रवासाठी एका व्यक्तिकडून 200 रुपये मागितले जात आहेत. तर रिक्षा चालक असलेल्या एकाने आमच्या बातमी दारासोबतही हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. काही त्रस्त सामान्य नागरिक 200 रुपये देऊनही प्रवास करताना दिसत आहेत. सतत पडत असलेल्या पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास आधीच उशीर होतोय. त्यात अनेक मुजोर रिक्षाचालक प्रवाशांना असे वेठीस धरत आहेत. या मुजोर रिक्षा चालकांवर कारवाई होणार का ? असा प्रश्न त्रस्त नागरिक विचारत आहेत.

घरांमध्ये पाणी 

अनेकांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी भरलंय..या पावसामुळे मुंबईचे जनजीवन ठप्प झालंय. मुंबईची लाईफलाईन कोलमडली असून ठाणे ते मुंबई प्रवास करणं शक्य नाही. अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे काही ठिकाणची रस्ते वाहतूक पूर्ण पणे ठप्प झाली आहे. तर काही ठिकाणी वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे. तर मुंबई विमानतळावरील उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत...तर मुंबईच्या दिशेने येणाऱ्या विमानाचा मार्ग बदलण्यात आला आहे..शाळा,शासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली.