हातावर त्रिशूल अन् ओमचा टॅटू... उत्तनच्या समुद्रकिनारी सापडलेल्या बेवारस बॅगने सर्वांनाच हादरवलं

Mira Bhayandar Crime News : उत्तन पोलीस ठाण्याच्या हद्दीत समुद्रकिनारी एका महिलेचा शिर नसलेला मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांनी सांगितले की, मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

आकाश नेटके | Updated: Jun 2, 2023, 03:56 PM IST
हातावर त्रिशूल अन् ओमचा टॅटू... उत्तनच्या समुद्रकिनारी सापडलेल्या बेवारस बॅगने सर्वांनाच हादरवलं title=

प्रथमेश तावडे, झी मीडिया, विरार : मुंबईपासून (Mumbai News) जवळच असलेल्या मीरा भाईंदरमध्ये (mira bhayandar) शीर नसलेला महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. भाईंदरच्या उत्तन समुद्रकिनारी (uttan beach) एका बॅगमध्ये या महिलेचा शीर नसलेला मृतदेह सापडला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. महिलेच्या हातावर टॅटू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

भाईंदर पश्चिमेच्या उत्तन समुद्रकिनाऱ्यावर एका अल्फा कंपनीच्या ट्रॅव्हल बॅगेत महिलेचे मुंडके नसलेले शरीर आढळून आल्याची घटना सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. सकाळी स्थानिक नागरिकांना ही बॅग निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती उत्तन सागरी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पाहणी केली असता महिलेचे शरीर दोन भागात कापून बॅगेत भरुन फेकल्याची माहिती समोर आली आहे. उत्तन पोलीस आता याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

मयत महिलेच्या हातावर त्रिशूल व ओम गोंदलेले आहे. तसेच मृत महिला 25 ते 30 वयोगटातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कपड्यांवरुन महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी उत्तन सागरी पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात हत्येचा गुन्हा नोंद केला आहे. या पूर्वीदेखील वसईच्या भुईगाव समुद्र किनाऱ्यावर अशाच प्रकारे एका महिलेचे मुंडके नसलेले धड बॅगेत समुद्रात फेकून दिलेल्या अवस्थेत पोलिसांना सापडले होते. दुसरीकडे मृतदेह असलेली बॅग पाण्यात वाहून आली की कोणीतरी फेकून दिली, याचा तपास उत्तन सागरी पोलीस करत आहेत.

ओळख पटल्यावर संपर्क करा, पोलिसांचे आवाहन

महिलेने लाल टी-शर्ट आणि हिरवे लेगिंग घातले आहे. पोलिसांनी लोकांना विनंती केली आहे की कोणी त्याला ओळखत असल्यास उत्तन पोलिसांशी संपर्क साधा. महिलेचा कोणी वारस, नातेवाईक किंवा मित्र आढळल्यास गुन्हे शाखा एम.बी.व्ही.शी संपर्क साधावा, असे आवाहन जनतेला करण्यात आले आहे.