मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल दुर्घटनेनंतर मुंबईतील सर्व रेल्वे पुलांचे ऑडीट नव्याने करण्यात येणार आहे. मात्र, गर्दीचे ठिकाण आणि जास्त रहदारी असलेला दादर पादचारी पूल उद्यापासून दुरुस्तीसाठी जवळपास तेरा दिवस बंद करण्यात येणार आहे, असे वृत्त एएनआयने दिले आहे. दरम्यान, सीएसएमटी स्थानकाबाहेरील पादचारी पूल कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला तर 36 जण जखमी झाले होते. या दुर्घटनेनंतर ही खबरदारी घेण्यात आली आहे. त्यामुळे दादर स्थानकातील सीएसएमटीच्या दिशेकडील पादचारी पूल रेल्वे दुरुस्तीसाठी उद्या रविवारपासून बंद करणार आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.
दादर पादचारी पुलाची पाहाणी शुक्रवारी पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केली. त्यानंतर या पुलाच्या दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी हा पूल बंद राहणार आहे. पश्चिम रेल्वेच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोन आणि तीनच्या पायऱ्या पुढील तेरा दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. तर प्लॅटफॉर्म क्रमांक एक जवळील पुलाच्या काही भागाची दुरुस्ती करण्यासाठी हा पूल तीन महिने बंद राहणार आहे. त्यामुळे 17 मार्च ते 16 जून 2019 पर्यंत पादचाऱ्यांना रेल्वेचा पादचारी पूल वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे.
- दादर स्टेशनवरील महानगर पालिकेच्या पादचारी पुलाची तात्काळ होणार दुरुस्ती
- पश्चिम रेल्वेच्या प्लॅटफॉर्म नंबर 1, 2 आणि 3 ला जोडणारा जिना राहणार बंद,
- 2 आणि 3 ला जोडणारे जिने 13 दिवस म्हणजे 17 पासून 29 मार्च पर्यंत राहणार बंद,
- तर प्लॅटफॉर्म 1 ला जोडणारा रॅम्प 90 दिवस म्हणजे 17 मार्च पासून 16 जूनपर्यंत राहणार बंद
- 14 तारखेला सी एस एम टी पूल इथे झालेल्या दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी पुलाची केले पाहाणी.
- यावेळी मुख्य स्टेशनचा पादचारी पूल वापरण्याची प्रवाश्यांना मुभा
Mumbai: Dadar footover bridge to be temporarily closed for strengthening work with effect from 17th March 2019. Staircase to stay closed for 13 days and the ramp for 90 days.#Maharashtra pic.twitter.com/02ik7KSdCu
— ANI (@ANI) March 16, 2019
दरम्यान, मुंबईतल्या सीएसएमटीजवळच्या पादचारी पुलाचं ऑडीट करणाऱ्या वादग्रस्त डी डी असोसिएट्स या कंपनीसंदर्भात अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. या कंपनीचं अंधेरीतल्या पर्ल हेरिटेजमध्ये असेलेलं कार्यालय गेल्या तीन महिन्यांपासून बंद असल्याची बाब पुढं आलीय. या कंपनीचं काम घरातूनच काम सुरू असल्याचंही समोर आले आहे.
काँग्रेस पक्षानं मरीन लाईन्स रेल्वे स्थानकाबाहेरील पादचारी पुलाच्या मुद्यावरून आंदोलन करण्यात आलं. मरिन लाईन्सचा पादचारी पूल धोकादायक अवस्थेत असून तो कधीही कोसळू शकतो. त्यामुळे तात्काळ पूल पाडण्यात यावा अशी मागणी आमदार भाई जगताप यांनी केली. पूल पाडण्यासाठी भाई जगताप यांनी १५ दिवसांची मुदत दिली आहे. जर १५ दिवसांमध्ये पूल न पाडल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.