दीपक भातुसे, मुंबई : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी येत्या सोमवारपासून अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे. मात्र तरीही काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील जागा वाटप अद्याप पूर्ण झालेले नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीतील काही जागांच्या अदलाबदलाची चर्चा अद्याप पूर्ण झालेली नाही. तर इतर मित्रपक्षांना कोणत्या जागा सोडायच्या याबाबतही अद्याप संभ्रम कायम आहे. आघाडीत नक्की काय चाललंय? लोकसभा निवडणुकीचं जागा वाटप लवकरात लवकर पूर्ण करून निवडणुकीच्या तयारीला लागायचं असा निर्णय काँग्रेस-राष्ट्रवादीने घेतला होता. त्यासाठी तीन महिन्यांपूर्वीच दोन्ही पक्षातील जागा वाटपाची चर्चा सुरू झाली. आता लोकसभा निवडणूक जाहीर होऊन पहिल्या टप्प्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतरही आघाडीतील जागा वाटपाचं घोडं अडलेलं आहे. तर दुसरीकडे काही जागांचे उमेदवार ठरवण्यावरून आघाडीत गोंधळ आहे.
- औरंगाबादची जागा काँग्रेसकडे असून राष्ट्रवादीला ती सतीश चव्हाण यांच्यासाठी हवी आहे. या जागेबाबत आघाडीत अद्याप निर्णय झालेला नाही.
- रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा काँग्रेसकडे आहे. मात्र ती जागा राष्ट्रवादीला देऊन राष्ट्रवादी त्या ठिकाणी नितेश राणे यांना पाठिंबा देईल अशी चर्चा सुरू आहे. या जागेबाबतही अद्याप आघाडीत संभ्रम आहे.
- रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या बदल्यात रावेरची जागा काँग्रेसला सोडली जाऊ शकते. मात्र त्याबाबतही अद्याप चर्चा नाही.
- राजू शेट्टी यांच्या स्वाभीमानी शेतकरी संघटनेला काँग्रेसकडून सांगलीची जागा सोडली जाईल अशी शक्यता आहे. मात्र त्याबाबतही अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.
आघाडीतील जागा वाटपाचा हा तिढा कायम असताना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही जागांवरील उमेदवार निश्चितीवरूनही गोंधळाचं वातावरण आहे. उमेदवार कोण द्यायचा यावरून पक्षनेतृत्वातच संभ्रम असल्याचं चित्र आहे.
- माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवारांनी माघार घेतल्यानंतर इथे कुणाला उमेदवारी द्यावी याचा निर्णय झालेला नाही. मोहीते-पाटील घराण्यात उमेदवारील द्यायला स्थानिक आमदार आणि काही पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे. माढासाठी सजयमामा शिंदे आणि दीपकआबा साळुंखे यांची नावं चर्चेत आहेत. मात्र त्याबाबतही अद्याप निर्णय झालेला नाही.
- अहमनगरची जागा काँग्रेसला न सोडल्याने सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर याठिकाणी कोणाला उमेदवारी द्यावी याबाबत राष्ट्रवादीतील खल संपताना दिसत नाही. इथून अरुणकाका जगताप किंवा त्यांचे पूत्र संग्राम जगताप यांचे नाव चर्चेत असले तरी त्याबाबतही पक्षाने निर्णय घेतलेला नाही
- काँग्रेसकडे असलेल्या जालना मतदारसंघात अद्याप उमेदवार निश्चित नाही. काँग्रेस सध्या अर्जुन खोतकर यांच्या निर्णयाची वाट बघतेय.
- चंद्रपुरात शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर यांनी काँग्रेस प्रवेशाची इच्छा व्यक्त करून इथून उमेदवारी मागितली आहे. मात्र त्याला स्थानिक काँग्रेस नेत्यांचा विरोध असून त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
- उत्तर मुंबई मतदारसंघात तर काँग्रेसला उमेदवार मिळणेही मुश्किल आहे. इथे अजूनही उमेदवाराचा शोध सुरू आहे.
- हिंगोली मतदारसंघातून विद्यमान खासदार राजीव सातव निवडणूक लढवण्यास तयार नसल्याने इथून कोणाला उमेदवारी द्यायची हा प्रश्न काँग्रेससमोर आहे.
- पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडे उमेदवार नाही. भाजपचे खासदार संजय काकडे काँग्रेसमध्ये प्रवेश करायला इच्छूक आहेत. मात्र त्याबाबत काँग्रेसने अद्याप निर्णय घेतलेला नाही.
- अकोला, शिर्डी, पालघर या मतदारसंघात काँग्रेसकडे उमेदवारच नाही.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस थेट नरेंद्र मोदींचा पराभव करण्याचं उद्दीष्ट्य ठेवून लोकसभेच्या रणांगणात उतरले आहेत. मात्र मोदींचा सामना करण्यासाठी लढाईची सुरुवात करण्याऐवजी अजूनही हे दोन्ही पक्ष जागावाटप आणि उमेदवार निश्चितीच्या गोंधळात अडकले आहेत. या गोंधळात हे विरोधक अगदी तयारीत असलेल्या भाजप-युतीचा सामना कसा करणार हा प्रश्न आहे.