Mumbai Crime : रविवारी रात्री मुंबईतील (Mumabi) पवई (Powai) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका इमारतीमध्ये एका मुलीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडल्याची माहिती समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पवईमध्ये एका इमारतीमधील फ्लॅटमध्ये मुलीचा मृतदेह सापडला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Mumbai Police) घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरु केला आहे. दरम्यान, फ्लॅटमध्ये तरुणीचा मृतदेह सापड्याने इमारतीमधील रहिवाशांना धक्का बसला आहे.
मुंबई पोलिसांचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मारवाह रोडवर असलेल्या एनजी हाऊसिंग सोसायटीमध्ये 25 वर्षीय तरुणीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांच्या पथकाने मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, हत्येचा गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींना पकडण्यासाठी चार पथके तयार करण्यात आली आहेत.
मृत तरुणी एअर होस्टेस असल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे. मात्र ही मृत तरुणी कोण आहे, ती फ्लॅटमध्ये कधीपासून एकटीच राहत होती आणि तिच्या हत्येमागचे कारण काय याबाबत पोलीस प्रत्येकाकडे तपास करत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
रूपल ओगरे (वय 23, रायपूर, छत्तीसगड) असं या एअर होस्टेसचं नाव आहे. रुपल ही पवईतल्या एनजी कॉम्प्लेक्स इथे तिची बहिण आणि मित्रासोबत राहायला होती. हत्येची घटना घडली तेव्हा रुपल घरी एकटीच होती. तिची बहिण आणि मित्र हे दोघेही आपल्या गावी गेले होते.
मुंबई पोलिसांचे डीसीपी दत्ता नलावडे यांनी सांगितले की, पवई पोलिसांच्या हद्दीतील एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये एका मुलीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला आहे, आम्ही प्रत्येक बाबींचा तपास करत आहोत. मृत तरुणी एअर होस्टेस होती, तिची नुकतीच एअर होस्टेस म्हणून निवड झाली होती.
सावत्र मुलांसह नवऱ्याकडून महिलेवर बलात्कार
मुंबईत ट्रॉम्बे परिसरात एका 40 वर्षीय व्यक्तीने त्याच्या दोन मुलांसह 32 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित महिला ही आरोपीची दुसरी पत्नी आणि दोन मुलांची सावत्र आई आहे. पीडित महिलेला दारू पाजून तीन महिन्यांहून अधिक काळ तिच्यावर अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. आरोपींनी पीडित महिलेचे अश्लील व्हिडीओ शूट करून पॉर्न वेबसाईटवर देखील अपलोड केले होते.
आरोपीने 22 जून रोजी पीडित महिलेला शीतपेयातून गुंगीचं औषध दिल्यामुळे ती बेशुद्ध झाली होती. यानंतर आरोपीनं मुलांनाही दारू पाजली आणि पीडितेवर बलात्कार करण्यास भाग पाडलं. आरोपीने हा सर्व प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आणि तो व्हिडीओ पॉर्न वेबसाईटवर अपलोड केला. आरोपीच्या फोनमध्ये व्हिडीओ आढळल्यानंतर शुक्रवारी पहाटे दोन वाजता, पीडितेनं तिच्या भावांसह पोलिसांकडे जात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.