Mumbai Coastal Road Leakage: साधारण 14 हजार कोटी रुपयांचा खर्च करुन मुंबई करांच्या सेवेत आलेला कोस्टल रोड काही महिन्यातच चर्चेत आला. पावसाळ्याच्या आधीच येथे गळती झाल्याचे पाहायला मिळाले. 'झी 24 तास' ने यासंदर्भातील वृत्त सर्वप्रथम दाखवले होते. यानंतर मुख्यमंत्र्यांनी कोस्टल रोडला भेट देऊन तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. दरम्यान कोस्टल रोडची गळती रोखण्यासाठी प्रशासनाकडून वेगाने पावले उचलली जात आहेत. या पार्श्वभूमीवर आता पालिका आयुक्तांनी कोस्टल रोडची पाहणी केली आहे.
मुंबई किनारी रस्ता प्रकल्प अंतर्गत भूमिगत दक्षिणवाहिनी बोगद्याच्या दोन सांध्यांमधून झिरपणारे पाणी रोखण्यात येत असल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिली. तर तीन सांध्यांच्या ठिकाणी असणारा ओलावा आटोक्यात आल्याचे ते म्हणाले. सर्व दुरुस्तीच्या कामांची आपण स्वत: खात्री केल्याचे ते म्हणाले.
डीबीसीच्या माध्यमातून ही पाणी गळती थांबविण्यात आली आहे. थोडफार लिकेज झालं तरी घाबरण्याचे कारण नाही. संभाव्य लिकेज होणार नाही, यासाठी आपण त्यांना पूर्ण वेळ दिलाय, असे गगराणी म्हणाले.
मुंबई किनारी रस्ता प्रकल्प अंतर्गत भूमिगत दक्षिणवाहिनी बोगद्याच्या दोन सांध्यांमधून झिरपणारे पाणी रोखण्यात येत आहे. तर तीन सांध्यांच्या ठिकाणी असणारा ओलावा आटोक्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी आज (दिनांक ३१ मे २०२४) पाहणी केली. सर्व… pic.twitter.com/VLePXeEz4N
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 31, 2024
भूमिगत बोगद्यात केलेल्या उपाययोजनांची माहिती यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी दिली. सह आयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) चक्रधर कांडळकर आदी उपस्थित होते.
प्रचंड गाजावाजा करत कोस्टल रोड सुरू करण्यात आला. कोस्टल रोडवरून रंगलेली श्रेयवादाची लढाई अवघ्या महाराष्ट्राने बघितली. मात्र काही दिवसाच्या आतच कोस्टल रोडच्या बोगद्याला गळती लागल्याचे वृत्त समोर आले होते. बोगद्याच्या भिंतीमधून पाणी झिरपायला लागल होतं. 11 मार्च 2024ला म्हणजे केवळ 2 महिन्यांआधी कोस्टल रोड वाहतुकीला खुला करण्यात आला. अवघ्या दोन महिन्यात कोस्टल रोडची ही अवस्था झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.
मुंबईच्या सागर किनाऱ्याने दक्षिण-उत्तर दिशेला जोडणारा कोस्टल रोड हा मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. तब्बल चौदा हजार कोटींचा कोस्टल रोड म्हणजे सागरी महामार्ग हा मुंबईच्या वाहतुक कोंड़ीवर उपाय असल्याचं सांगितलं जातं. मुंबईच्या समुद्रात किनाऱ्यालगत काही ठिकाणी भरावावर, कुठे बोगद्यातून तर कुठे ब्रिजवरून हा रस्ता जाणार आहे. जिथे रस्त्यांची अदलाबदल होते अशा ठिकाणी कनेक्टर जंक्शन उभी केली जाणार आहेत. या प्रकल्पाअंतर्गत 8 मार्गिकांच्या रस्त्याला लागूनच लोकांना चालता येईल असा मार्ग, पार्किंग आणि बागेसाठीही जागा तयार केली जाणार आहे.