मुंबई महापालिकेत शिवसेनेविरोधात भाजपकडून आक्रमक चेहऱ्याचा शोध

मुंबई महापालिकेत शिवसेनेला टक्कर देण्यासाठी भाजपची रणनीती....

Updated: Dec 20, 2019, 03:24 PM IST
मुंबई महापालिकेत शिवसेनेविरोधात भाजपकडून आक्रमक चेहऱ्याचा शोध title=

कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : मुंबई महापालिकेच्या राजकारणात भाजपला आक्रमक तर व्हायचंय परंतु गटनेते मनोज कोटक खासदार झाल्यापासून दुसरा चेहराच भाजपला पालिकेत सापडेना. त्यामुळंच आता भालचंद्र शिरसाट किंवा प्रविण छेडा यांना नगरसेवक म्हणून निवडून आणून त्यांच्या गळ्यात विरोधी पक्षनेत्याची माळ घालण्याचे नियोजन मुंबई भाजपमध्ये सुरू आहे.

राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेनं काँग्रेस राष्ट्रवादीसोबत संधान बांधून सत्तास्थापन केल्यामुळं भाजप आता सर्वच पातळीवर शिवसेनेला टशन देण्याचा प्रयत्न करतं आहे. त्यामुळंच शिवसेनेचा जीव असलेल्या मुंबई महापालिकेतही विविध विषयांवरून घेरण्यासाठी भाजपचे नियोजन आहे. परंतु गटनेते मनोज कोटक खासदार झाल्यापासून पालिकेत भाजपची विविध विषयांवरची भूमिकाच ठरत नाही आहे. त्यामुळं भाजप नगरसेवकांचा समिती बैठकांमध्ये आणि सभागृहामध्येही अपेक्षित विरोधाची धार दिसत नाही आहे.

२०२२ च्या मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग भाजप आतापासूनच फुंकत असलं तरी त्यासाठी पालिकेत सत्ताधारी शिवसेनेविरोधात आक्रमक होण्याची गरज आहे. परंतु सध्या याचाच मुळात अभाव दिसून येतो आहे. त्यासाठीच मुंबई भाजपमध्ये वेगळी रणनीती आखली जात आहे. महापालिकेत नगरसेवक असलेले मुलुंडचे मनोज कोटक खासदार झालेत तर घाटकोपरचे पराग शहा आमदार झाले आहेत. त्यामुळं या दोघांना नगरसेवकपदाचा राजीनामा द्यायला सांगून त्या ठिकाणाहून भालचंद्र शिरसाट किंवा प्रवीण छेडा यांना निवडून आणायचे आणि महापालिकेतील भाजपच्या नेतृत्वाची धुरा यांच्याकडं सोपवायची आहे. कारण हे दोन्ही प्रभाग भाजपसाठी अत्यंत सुरक्षित समजले जातात. 

मुंबई भाजपमध्ये अशा प्रकारची चाचपणी केली जात असून याला भाजपमधून दुजोरा मिळत आहे. मुंबई महापालिकेत पहारेकऱ्यांच्या भूमिकेत असलेल्या भाजपला आता विरोधकांची भूमिका बजवायची आहे. त्यासाठी भाजप नियोजनबद्ध रणनीती आखत असली तरी दुसरीकडं शिवसेनेला आता काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सपाचीही साथ मिळणार आहे. त्यामुळं महापालिकेच्या राजकारणातील संघर्ष येत्या काही दिवसांत तीव्र झालेला पहायला मिळणा आहे.