अंधेरी दुर्घटना : मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली

ठाण्यातील कोपरीसारखी घटना अंधेरीमध्ये घडली असती मात्र... 

Updated: Jul 3, 2018, 11:53 AM IST

मुंबई : ठाण्यातील कोपरीसारखी घटना अंधेरीमध्ये घडली असती. मात्र मोटरमन चंद्रशेखर सावंत यांच्या प्रसंगावधानामुळे ही दुर्घटना टळली. सकाळी सात वाजून सहा मिनिटांनी बोरिवलीवरून सुटणारी लोकल होती. पूल कोसळत असताना पाहताच मोटरमननं लोकल थांबवली. मोटरमन सावंत यांनी आर्मीमध्ये सेवा केली आहे. मोटरमननं प्रसंगावधान दाखवून गाडी थांबवल्यामुळं मोठी जीवितहानी टळल्याचं पोलसांनी म्हटलंय. 

पश्चिम रेल्वे ठप्प

दरम्यान, पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्थानकातला पादचारी पूल कोसळल्यानं आज सकाळीच लोकल वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय. सध्या पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे... या अपघातात पाच जण जखमी झाले आहेत. पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाल्यामुळे त्याचा फटका रेल्वे प्रवाशांना बसतोय. तर रस्ते वाहतुकीवरही त्याचा परिणाम होताना दिसतोय. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याच पहायला मिळतंय. त्यात संततधार पडणाऱ्या पावसामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत. प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत. बेस्ट प्रशासनान जादा बसेस सोडल्या आहेत. कोसळलेल्या पुलाचा ढिगारा बाजूला करण्याचं काम सुरू आहे. महापालिकेचं अग्निशमन दल, एनडीआरएफ मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. बघ्यांना घटनास्थळी गर्दी करू नये, असं आवाहन करण्यात येतंय... पुलाचा भाग कोसळल्याने ओव्हर हेड वायर तुटल्या आहेत. या ढिगाऱ्याखाली एक जण अडकला होता, त्याची सुटका करण्यात यश आलंय.

सहा जण जखमी

अंधेरीतल्या पूल दुर्घटनेत आत्तापर्यंत सहा जण जखमी झाल्याचं समोर येतोय... यात २ जणांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती गंभीर आहे... तर तीन जणांना फ्रॅक्चर झालंय. एकूण चार पुरुष आणि एक महिला यात जखमी झाले आहेत... द्वारकाप्रसाद शर्मा, मनोज मेहता, हरिश कोहाटे, गिंधम सिंघ अशी जखमी झालेल्या पुरुषांची नावं आहेत... तर एक महिला जखमी आहे.