मुंबईची हवा दिल्लीपेक्षा जास्त खराब; दोन दिवसांपासून वातावरण अधिकच दूषित

Mumbai Air Quality : मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेच्या बाबतीत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आकडेवारीनुसार. मुंबईची हवा ही दिल्लीच्या हवेपेक्षाही खराब असल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील हवा अधिक प्रमाणात दूषित झाल्याचे पाहायला मिळतंय.

Updated: Oct 5, 2023, 09:03 AM IST
मुंबईची हवा दिल्लीपेक्षा जास्त खराब; दोन दिवसांपासून वातावरण अधिकच दूषित title=

Mumbai News : गेल्या काही वर्षात मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेत (Mumbai Air Quality) सातत्याने घट झाल्याचे दिसून आले आहे. याउलट, आता दिल्ली (Delhi) आणि लखनऊच्या हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली आहे. दोन्ही शहरांमधली हवा ही सुरुवातीला मुंबईपेक्षा खराब होती. अशातच आता मुंबईच्या हवेची गुणवत्ता खाली घसरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळेच मुंबईच्या हवेमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिघाड झाल्याचे दिसून आले असून कुलाबा, वरळी, वांद्रे-कुर्ला संकुल येथे याचा अधिक परिणाम जाणवत आहे. दुसरीकडे वर्ल्ड ऑफ स्टॅटस्टिकनुसार, देशातील दोन शहरांची हवा सर्वात स्वच्छ आहे. देशातील मंगळुरू येथील हवा सर्वात स्वच्छ आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, कोलकाता, लखनऊ आणि पाटणा या सहा प्रमुख राज्यांच्या राजधानीत 'राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमा'अंतर्गत हवेच्या गुणवत्तेचा अभ्यास करण्यात आला आहे. गेल्या संपूर्ण वर्षातील पीएम 2.5 ची नोंद आणि ऑक्टोबर ते मार्च दरम्यानची प्रदूषण पातळी या आधारे हा अभ्यास करण्यात आला होता. दरम्यान, मंगळवारी, मुंबईच्या हवा गुणवत्ता निर्देशांकाने (AQI) जवळपास आठ महिन्यांत प्रथमच 'मध्यम' श्रेणीत प्रवेश केला होता. मंगळवारी मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक 150 होता.

दुसरीकडे, दिल्ली अद्यापही प्रदूषणाच्या यादीमध्ये अजूनही पहिल्या क्रमांकावर आले. मात्र 1 ऑक्टोबर 2022 ते 30 सप्टेंबर 2023 या दरम्यान दिल्लीच्या हवेच्या गुणवत्तेत हळुहळू सुधारणा होत असल्याचे आढळून आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे या यादीत पहिल्या 10 शहरांमध्ये मुंबईचा समावेश नाही.

जानेवारी-मार्च या तिमाहीत, मुंबईत 2019 मधील पीएम 2.5 पातळी 50.2 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटरवरून 2023 मध्ये 80.6 मायक्रोग्राम प्रति घनमीटरवर पोहोचून हवेच्या गुणवत्तेत सातत्याने घट झाली आहे. 2022 मधील ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत, 2021 च्या तुलनेत सरासरी पीएम 2.5 पातळी एवढी वाढली. मात्र 2020 मधील तिमाहीपेक्षा ती थोडी कमी होती. त्यामुळे या निष्कर्षावरुन मुंबईतील कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दिशेने एकत्रित प्रयत्न वाढवण्याचे गरज आहे हे अधोरेखित करते.

मंगळवारी सफर (सिस्टम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च) द्वारे नोंदवण्यात आलेल्या निरीक्षणांपैकी नवी मुंबईत 201, मालाड 200, माझगाव 170 आणि अंधेरी 161 एक्यूआय नोंदवण्यात आली आहे. तर कुलाबा हे सर्वात प्रदूषित ठिकाण होते, ज्याची हवेची गुणवत्ता 318 होता. यासाठी उच्च आर्द्रता आणि वाऱ्याचा वेग कमी होणे ही कारणे आहेत.