बुलेटच्या चाकात ओढणी अडकली अन्... श्रावणी सोमवारनिमित्त दर्शनासाठी गेलेल्या महिलेचा मृत्यू

Mumbai News : वसईच्या तुंगारेश्वर येथील महादेवाचं दर्शन घेऊन घरी परतणाऱ्या कांदिवलीतील एका महिलेला विचित्र अपघातात जीव गमवावा लागला आहे. या घटनेनंतर महिलेच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

आकाश नेटके | Updated: Aug 22, 2023, 02:01 PM IST
बुलेटच्या चाकात ओढणी अडकली अन्... श्रावणी सोमवारनिमित्त दर्शनासाठी गेलेल्या महिलेचा मृत्यू title=

प्रथमेश तावडे, झी मीडिया, विरार : वसईत (Vasai News) बुलेटवरून प्रवास करणे एका महिलेच्या जीवावर बेतले आहे. पतीसोबत देवदर्शनासाठी गेलेल्या महिलेचा बुलेटच्या (Bullet) मागात ओढणी अडकल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कांदिवलीमधील ही महिला वसईच्या तुंगारेश्वर येथे महादेवाचं दर्शन घेण्यासाठी पतीसोबत गेली होती. देवदर्शन करुन घरी परतत असताना हा धक्कादायक प्रकार घडला. पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे.

कांदिवली येथे राहणाऱ्या प्रतिमा यादव या श्रावणी सोमवार निमित्ताने आपल्या पतीसोबत वसईच्या तुंगारेश्वर मंदिरात देव दर्शनासाठी आल्या होत्या. परतीच्या प्रवासात महामार्गावरून पुन्हा घरी परतत असताना बुलेटच्या पाठीमागे बसलेल्या प्रतिमा यांची ड्रेसचीं ओढणी बुलेटच्या मागच्या चाकात अडकली. ओढणी चाकात अडकल्याने प्रतिमा यादव यांच्या गळ्याला फास लागला. प्रतिमा यांना पतीने उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गांवरील बाफाने फाट्याजवळ ही घटना घडली.

प्रतिमा यादव या कांदिवली पश्चिमेतील ईराणीवाडीतील ठाकूर चाळीतील लक्ष्मी निवास इथे वास्तव्यास होत्या. श्रावणी सोमवार निमित्त प्रतिमा यादव या त्यांचे पती मनीषकुमार यादव यांच्यासोबत पहाटेच्या सुमारास वसईतील तुंगारेश्वरला जाण्यास निघाल्या होत्या. महादेवाच्या दर्शन करुन यादव दाम्पत्य मुंबई-अहमदाबाद महामार्गावरुन घरी परतत होतं. त्यांची दुचाकी वसई बाफाणे हद्दीत असताना आली असताना प्रतिमा यांच्या गळ्यातील ओढणी बुलेटच्या मागील चाकात अडकली.

ओढणी चाकात अडकल्यानं प्रतिमा यांच्या गळ्याला फास बसला आणि त्या खाली पडल्या. त्यामुळे प्रतिमा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मनीषकुमार यांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेमुळे यादव कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

पालघरमध्ये महिला बस वाहकाचा मृत्यू

पालघर बस आगारातील एका महिला बस वाहकाचा ड्युटीवर असतानाच मृत्यू झाल्याने आगारात एकच खळबळ उडाली आहे. मंदा गुरुनाथ काळे असे या अविवाहित महिलेचं नाव असून त्या वाड्यातील सापने येथील रहिवासी होत्या. सोमवारी ड्युटीवर असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने पालघरमधील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती अधिक गंभीर झाल्याने त्यांना पुढे दादरा नगर हवेलीतील सिल्वासा येथे हलवण्यात आलं होतं. मात्र रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. मंदा काळे यांनी सकाळीच येऊन बसच्या दोन फेऱ्या पूर्ण केल्या होत्या.