मुंबईत दुमजली टोल बुथ उभारण्याचा एमएसआरडीसी विचार

मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार

Updated: Oct 1, 2018, 09:58 AM IST
मुंबईत दुमजली टोल बुथ उभारण्याचा एमएसआरडीसी विचार title=

मुंबई : टोलनाक्यांवरती वाहनांची लांबच लांब रांगा बहुतेक वेळा पाहायला मिळते. मुंबई शहराच्या पाच प्रवेश केंद्रांवरतीही हेच चित्र पाहायला मिळतं. त्यामुळे इथल्या वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्याकरता, एमएसआरडीसी नव्या पर्यायाचा विचार करतंय. त्यानुसार टोलनाक्यांवर दुमजली टोल बुथ उभारण्याचा विचार, एमएसआरडीसी करत आहे. 

टोल बुथवरती आणखी एक टोल बुथ

सध्याच्याच टोल बुथवरती आणखी एक टोल बुथ उभारला जाणार आहे. यामुळे टोल वसुलीचं काम वेगानं होईल. तसंच टोल नाक्यांवरची वाहनांची लांब रांग कमी होईल असा विश्वास, एमएसआरडीसीनं व्यक्त केला आहे. वरच्या मजल्यावरच्या टोल बुथकडे गाड्यांना जाता यावं यासाठी, स्टीलचा सांगाडा आणि रॅम्पची व्यवस्था केली जाणार आहे. हलक्या वजनाच्या वाहनांसाठीच या स्टीलच्या सांगाड्याचा वापर केला जाईल. 

आयआयटी पवईची घेणार मदत 

अवजड वाहनांकरता तळमजल्यावरील टोल बुथच वापरले जाणार आहेत. टोल नाक्यावरची वाहतूक या पर्यायाद्वारे सुरळीत आणि वेगात व्हावी यासाठी, आयआयटी पवईचीही मदत एमएसआरडीसी घेणार आहे. असं झाल्यास मुंबईकरांना या समस्येतून मोठा दिलासा मिळणार आहे.