दीपक भातुसे, मुंबई : मुंबईला मोठ्या संकटातून वाचवायचे असेल तर धारावीत कठोर उपाययोजना करून पूर्णतः लॉकडाऊन करा, अशी मागणी त्या भागाचे खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. अन्यथा मुंबईवर मोठे संकट येईल, असा इशाराही त्यांनी दिली आहे.
मुंबईत लॉकडाऊन केले असले तरी अनेक ठिकाणी त्याचे पालन केल्याचे दिसत नाही. धारावी ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी समजली जाते. लाखो लोक धारावीत झोपड्यांमध्ये दाटीवाटीनं राहतात. या भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णही आढळले आहेत. मरकजहून आलेल्या काही लोकांना धारावीत आसरा देण्यात आला होता. ज्यानं आसरा दिला त्याचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यानंतर एक डॉक्टर आणि अन्य ५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. धारावीत कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतरही लोक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत असल्याचं चित्र दिसत आहे. झी २४ तासनेही याबाबतचं वृत्त दाखवलं होतं. त्याची दखल खासदार राहुल शेवाळे यांनी घेतली आहे.
दाट लोकसंख्येमुळे धारावीत कोरोनाचा प्रादुर्भाव जलद होऊ शकतो आणि त्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकतो. त्यामुळे राज्य राखीव पोलीस दलाला पाचारण करून हा परिसर पूर्ण लॉकडाऊन करावा. तसेच संपूर्ण धारावीत निर्जंतुकीकरण करावे, सर्व नागरिकांची कोरोना तपासणी करावी, अन्नधान्याची कमतरता भासू नये म्हणून स्वतंत्र शिधावाटप व्यवस्था आणि एक स्वतंत्र किचनही सुरु करावे आणि महापालिकेनं धारावीतील सर्व रुग्णालये ताब्यात घेऊन कोरोनाबाधितांसाठी राखीव ठेवावीत, अशा मागण्या राहुल शेवाळे यांनी केल्या आहेत.
मुंबईत धारावीपाठोपाठ आता आणखी एक मोठी झोपडपट्टी असलेल्या बेहरामपाड्यातही कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. त्याचं मरकज कनेक्शन असल्याचं समजतं. हा रुग्ण मरकजला जाऊन आला होता अशी माहिती आहे. याशिवाय अंधेरीच्या नेहरु झोपडपट्टीत एक रुग्ण आढळून आला आहे, तर कुर्ल्याच्या झोपडपट्टीत ८ रुग्ण आढळले आहेत. झोपडपट्ट्यांमध्ये दाट लोकवस्ती असल्यानं कोरोनाचा फैलाव अधिक वेगानं होऊ शकते. त्यामुळे झोपडपट्टीत कोरोना पसरला तर मुंबईला अधिक धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.