मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांना मुंबईत लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यामुळे त्या आपले पती आमदार रवी राणा यांच्यासह मुंबई येथील निवासस्थानी होमक्वांरटांइन आहेत. त्यांनी मुंबईतल्या घरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करत फेसबुक लाइव्हद्वारे जनतेशी संवाद साधलाय.
खासदार नवनीत राणा यांच्या सह पती आमदार रवी राणा आणि राणा कुटुंबातील १२ जणांना कोरोनाची लागण झाली होती. यात कुटुंबातील ११ जणांनी कोरोनावर मात केली. मात्र खासदार नवनीत राणा यांचा कोरोना अहवाल मुंबई मनपाने पॉझिटिव्ह दिला त्यामुळे डॉक्टरांनी खासदार नवनीत राणा यांना होमक्वांरटाइन राहण्याचा सल्ला दिला होता.
गेल्या २२ दिवसापासून नवनीत राणा कोरोनाशी लढत आहेत. मुंबई येथील निवासस्थानी त्यांनी आज गणपती बसवत विधीवत पूजा केली. आमदार रवी राणा यांनी देखील गणपतीची आरती करत लवकरात लवकर कोरोनाचे संकट दूर होवो अशी अपेक्षा आणि प्रार्थना गणरायाकडे केली. नवनीत राणा यांनी घरी गणपतीसाठी आपल्या हाताने मोदक करत संवाद साधला.