मुंबई : मातोश्री'वरील आजच्या बैठकीत आमदार आणि मंत्र्यांना मोबाईल बाळगण्यास बंदी घातली गेली आहे. शिवसेनेतल्या डॅमेज कंट्रोलसाठी ही रणनिती आखण्यात आली आहे. गेल्यावेळी बैठकीत जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांमधला वाद चव्हाट्यावर आला होता.
विशेष म्हणजे या बैठकीतल्या वादाची दृश्येही मीडियापर्यंत पोहचली होती. त्यामुळं शिवसेना नेतृत्वानं यावेळी खबरदारी घेतल्याचं बोललं जातं आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक होते आहे. मतदार संघात कामं होत नाहीत आणि विकास निधी मिळत नाही अशी आमदारांची तक्रार आहे. गेल्या आठवड्यात पक्षाचे आमदार तुकाराम काते यांनी पक्षाच्या मंत्र्यांवर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.
पक्षाचे मंत्री बिनकामाचे असल्याचा कातेंनी हल्ला चढवला होता. तसंच शिवसेनेच्या नाराज आमदारांना गळाला लावण्याची भाजपनं व्युव्हरचना आखली आहे. आता 'डॅमेज कंट्रोल'साठी शिवसेनेत धावपळ सुरु आहे. दरम्यान पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी पेट्रोल दरवाढीवरून भाजपला लक्ष्य केलं आहे.