'स्वत:च्याच प्रतिबिंबावर धडकणार का?', ठाकरे गटाच्या मोर्चाला मनसेने डिवचले

MNS On Thackeray Group Morcha: आज मुंबईत विरोधी पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा 'आक्रोश मोर्चा' मुंबई महापालिका मुख्यलयावर निघणार आहे. मनसेकडून बॅनरच्या माध्यमातून ठाकरे गटाच्या मोर्चाला डिवचण्यात आले आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Jul 1, 2023, 01:40 PM IST
'स्वत:च्याच प्रतिबिंबावर धडकणार का?', ठाकरे गटाच्या मोर्चाला मनसेने डिवचले  title=

Thackeray Group Morcha: आज मुंबईत विरोधी पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा 'आक्रोश मोर्चा' मुंबई महापालिका मुख्यलयावर निघणार आहे. दरम्यान या मोर्चाच्या आधीच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजपने याआधीच ठाकरे गटाला मोर्चावरुन घेरायला सुरुवात केली आहे. त्यात आता मनसेनेदेखील उडी घेतली आहे. मनसेकडून बॅनरच्या माध्यमातून ठाकरे गटाच्या मोर्चाला डिवचण्यात आले आहे. 

वांद्रे कलानगर बस थांबा इथे मनसेच्या वतीने ठाकरे गटाच्या आजच्या मुंबई महानगरपालिकेवर असणाऱ्या मोर्चाला डीवचणारा बॅनर लावण्यात आला आहे. स्वतःच्या प्रतिबिंबावरच धडकणार का ? असा मजकूर या बॅनरवर लिहिलेला आहे. 

या बॅनरच्या माध्यमातून ठाकरे गटाच्या आजच्या मोर्चावर मनसेकडून टीका करण्यात आलेली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील ट्विटरवर 'चोराच्या उलट्या बोंबा' असे लिहून हे पोस्टर शेअर करत टीका केली होती.

'ठाकरे परिवाराची अस्तित्वासाठी लढाई'

हा मोर्चा म्हणजे ठाकरे परिवाराची आपल्या अस्तित्वासाठी चाललेली धडपड असल्याची टिका भाजप नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. अपघातावर किळसवाणे राजकारण करणे ही संजय राऊतची विकृत मानसिकता.ही टाळू वरच लोणी खाणारी औलाद असल्याचे ते म्हणाले.

मुंबईच्या स्वाभिमान साठी हा मोर्चा उद्धव ठाकरे यांनी काढला आहे मुंबईकरांचे पैसे आहेत त्याची वाट हे सरकार लावत आहे ,त्यांना जाब विचारला हा मोर्चा असल्याची प्रतिक्रिया खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे. आमचा मोर्चा ही क्रिया असल्याने भाजपचा मोर्चाही प्रतिक्रिया होती, असे ते म्हणाले. दरम्यान आमचा मोर्चा होणारच असेही ते म्हणाले. 

'मुंबईकर विचारतोय….?'

ठाकरे गटाला भ्रष्ट्राचारावर विचारणारे बॅनर आज त्यांच्या मोर्चाच्या मार्गावर लावण्यात आलेत. महाविकास आघाडीच्या काळात झालेल्या भ्रष्ट्राचारावर ठाकरे गटाला प्रश्न विचारणारे बॅनर मुंबईत ठाकरे गटाच्या मोर्च्याच्या मार्गावर लावण्यात आलेत.

या मोर्चाला प्रतिउत्तर देण्यासाठी सत्ताधारी शिवसेना-भाजपा युतीनेही मुंबईत नरीमन पॅाईट आणि दादर येथे “चोर मचाये शोर” हा मोर्चा काढणार आहेत. त्याच बरोबर ठाकरे गटाचा मोर्चा ज्या मेट्रो सिनेमा ते बीएमसी या मार्गावरून जाणार आहे…. त्या मार्गावर “मी मुंबईकर विचारतोय…?” असे बॅनरही लावण्यात आले आहेत. 

या बॅनरवर महाविकास आघाडीच्या काळात झालेल्या प्रत्येक भ्रष्ट्राचाराच्या आरोपांवर सर्व सामान्य मुंबईकरांचे प्रश्नं मांडण्यात आले आहेत…. तसेच जे आरोप करण्यात आलेत त्यावर आता ठाकरे गट कधी मोर्चा काढणार? असा ही प्रश्नं विचारण्यात आलांय.