मुंबईच्या रस्त्यावरील खड्डे आता 2 तासांत गायब होणार; BMCने आणली नवी Technique

BMC Road News: पावसाळ्यात मुंबईकरांसाठी एक मोठी डोकेदुखी ठरते ती म्हणजे रस्त्यांवरचे खड्डे. मात्र, त्यावर आता पालिकेने उपाय ठरवला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 1, 2023, 11:39 AM IST
मुंबईच्या रस्त्यावरील खड्डे आता 2 तासांत गायब होणार; BMCने आणली नवी Technique title=
bmc road potholes will be fixed by a new technique

मुंबईः पावसाळ्यात मुंबईकरांची एकच तक्रार असते ती म्हणजे रस्त्यावर पडलेले खड्डे पण आता मुंबई महानगरपालिकेने यावर उपाय शोधला आहे. पावसाळा सुरू झाली की रस्त्यावरील खड्ड्यांमुळं अनेक अपघात होतात. या अपघातात अनेकांना जीवही गमवावे लागले आहेत. यावरुन मुंबई महानगरपालिकेला टीकेला सामोरे जावे लागते. खड्डे बुजवण्यासाठी महापालिका कोट्यवधींचा खर्च करत असते मात्र काही महिन्यांनंतर पुन्हा परिस्थिती जैसे थेच असते. मात्र, आता या समस्येवर बीएमसीने एक पर्याय शोधला आहे. पालिका पहिल्यांदाच खड्डे भरुन काढण्यासाठी रिअॅक्टिव्ह अस्फाल्ट या तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. या तंत्रज्ञानामुळं  खड्डे बुजवल्यानंतर अवघ्या दोन तासांत तो रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जाणार असल्याचा दावा केला जात आहे. 

मुंबईतील वाहतूक कोंडी ही प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरते. त्यात रस्त्यात खड्डे असल्यास अपघात होण्याचा धोकाही वाढतो. महापालिका दरवर्षी कोट्यवधी रुपये खड्डे बुजवण्यासाठी वापरते. तरीही दरवर्षी खड्ड्यांची समस्या कायम असते. यंदा रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेने रिअॅक्टिव्ह अस्फाल्टचा एच/पूर्व विभागात खार सबवे येथे प्रथमच वापर केला आहे. या प्रय़त्न  यशस्वी झाल्याचंही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. या नवीन तंत्रज्ञांनाना अवघ्या दोन तासांत रस्ते वाहतूक सुरळीत करण्यात येईल. 

मुंबईत तीन ठिकाणी रिअॅक्टिव्ह अस्फाल्टचा वापर करण्यात आला. सुरुवातील 29 जून 2023 रोजी खार भुयारी मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी याचा वापर करण्यात आला. हा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर पालिकेने संपूर्ण मुंबईत याचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील प्रत्येक विभागातील खड्डे बुजवण्यासाठी या मिश्रणाचा वापर करण्यात येणार आहे. 

रिॲक्टीव्ह अस्फाल्ट’ हे एक केमिकल मिश्रीत डांबर आहे. पाण्याच्या संपर्कात आल्याने डांबरी रस्त्यावर खड्डे तयार होतात, मात्र रिॲक्टीव्ह अस्फाल्टच्या मिश्रणावर पाणी टाकूनच खड्डा भरण्यात येतो. केमिकलची पावडर, खडी आणि पाणी या मिश्रणाचा वापर करुन खड्डे बुजवण्यात येतात. ‘रिअॅक्टीव्ह अस्फाल्ट’मधील केमिकल पावडरवर पाण्याचा कोणताही परिणाम होत नाही.  त्यामुळं खड्डा बुजवल्यानंतर अवघ्या दोन तासांमध्ये वाहतूक सुरू करता येते, असे मिश्रणाचे वैशिष्ट्य आहे. मुंबईतील सर्व २४ विभागांना मिश्रणाच्या पिशव्या पुरविण्यात आल्या आहेत. इकोग्रीन इन्फ्रा डेव्हलपमेंट या कंपनीकडून हे तंत्रज्ञान विभागांना पुरवण्यात आले आहे. त्यातील केमिकल पावडरची आयात करण्यात आली आहे.

पालिकेकडून गतवर्षीच्या पावसाळ्यात रॅपिड हार्डनिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता. नऊ सेवा पुरवठादारांच्या माध्यमातून मुंबईत रॅपिड हार्डनिंगचा वापर करण्यात येईल. या तंत्रज्ञानाच्या वापरातही पालिकेला यश मिळाले. मात्र या तंत्रज्ञानाच्या वापरासाठी कोरड्या पृष्ठभागाची गरज असते. रॅपिड हार्डनिंग कॉंक्रिगचा वापर केल्यानंतर सदर रस्त्यावरून सहा तासांनी वाहतूक सुरू करणे शक्य होते.