'विनवण्या, अर्ज सर्वकाही झालं; आता साहेबांच्या आदेशानं....'

साऱ्यांचंच या निर्णयाकडे लक्ष लागलं आहे.   

Updated: Nov 19, 2020, 10:27 AM IST
'विनवण्या, अर्ज सर्वकाही झालं; आता साहेबांच्या आदेशानं....' title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात आलेल्या वाढीव वीज बिलांनी सर्वसामान्यांना घाम फुटत असतानाच राज्य सरकार मात्र आता यातून हात वर काढू पाहात आहे. सुरुवातीला वीज बिलांमध्ये दिलासा देण्यासाठीच्या गोष्टी करणाऱ्या राज्य सरकारनं आपल्याच शब्दावर घुमजाव केला आहे. राज्यातील जनतेला वीज बिलामध्ये कोणहीची सवलत अथवा माफी दिली जाणार नाही, असं खुद्द उर्जामंत्री नितीन राऊत यांनीच सांगितलं. ज्यामुळं आता सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यात येत आहे. 

विरोधी पक्षांकडून राज्य शासनावर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. ज्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत गुरुवाती पक्षाची बैठक पार पडणार आहे. याच बैठकीपूर्वी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत राज्य सरकारला इशारा देत मोठ्या संघर्षाचे संकेत दिले. 

वीज बिला संदर्भात निवेदन, अर्ज, बैठका, विनवण्या सगळं झालं. पण सरकार ढिम्म आहे. जनतेला दिलासा देण्यासाठी साहेबांच्या आदेशानंतर रस्त्यावर संघर्ष करावाच लागेल कारण"लाथो के भूत बातों से नही मानते", असं त्यांनी या ट्विटमध्ये लिहिलं. 

 

मुख्य म्हणजे खुद्द राज ठाकरे यांनीही मागील महिन्यात वाढीव वीज बिलाचा मुद्दा राज्यपालांकडेही उचलून धरला होता. त्यातच आता सरकारनं स्पष्टपणे बिलात सवलत देण्यास नकार दिल्यामुळं हा वाद आणखी पेटून विरोधी आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी होण्याची चिन्हं आहेत.