MNS Padwa Melava: नारायण राणे शिवसेनेमधून बाहेर पडलेच नसते पण...; राज ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

MNS Padwa Melava Raj Thackeray Slams Uddhav: राज ठाकरेंनी थेट उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत हल्लाबोल केला. तसेच शिवसेना आणि धनुष्यबाण या वादावरही राज ठाकरेंनी पहिल्यांदाच उघडपणे भाष्य केलं.

Updated: Mar 22, 2023, 08:58 PM IST
MNS Padwa Melava: नारायण राणे शिवसेनेमधून बाहेर पडलेच नसते पण...; राज ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट title=
MNS Padwa Melava Raj Thackeray

MNS Padwa Melava Raj Thackeray Slams Uddhav: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुंबईमधील दादर येथील शिवाजीपार्कवरील मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंना थेट लक्ष्य केलं. यावेळी राज ठाकरेंनी विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे शिवसेनेमधून बाहेर पडल्याची आठवण सांगितली. यावेळी राज यांनी नारायण राणे बाहेर पडण्यासाठी उद्धव ठाकरे कारणीभूत असल्याचं म्हटलं. 

पक्षातून बाहेर काढण्याचे प्रयत्न

पक्षामधील लोकांना त्रास देऊन बाहेर काढण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केल्याचं राज ठाकरे म्हणाले. यावेळेस त्यांनी शिवसेना सोडण्याआधी आपली उद्धव ठाकरेंबरोबर चर्चा झाली होती असंही सांगितलं. त्यामध्ये त्यांना अगदी शिवसेनेमधील प्रमुखपदापासून ते मुख्यमंत्रीपद सर्वकाही उद्धव ठाकरेंना देण्यास तयार असल्याचं ठरलं आणि ते बाळासाहेबांना सांगितलं होतं, अशीही आठवण सांगितली. यानंतर राज ठाकरेंनी थेट नारायण राणेंचा उल्लेख करत त्यांनाही अशाच पद्धतीने पक्षाबाहेर जाऊ दिल्याची आठवण सांगितली. नारायण राणे बाहेर जाण्यासाठी उद्धव ठाकरेच जबाबदार असल्याचं राज यांनी म्हटलं.

राणे बाहेर गेलेच नसते, बाळासाहेबांना फोन

राज यांनी नारायण राणे शिवसेनेमधून बाहेर पडले तेव्हा नेमकं काय घडलं, बाळासाहेबांबरोबर फोनवर काय चर्चा झाली याबद्दलची माहिती दिली. "मी नारायण राणेंची गोष्ट सांगतो. नारायण राणे बाहेर पडलेच नसते. नारायण राणेंचं हे सगळं ठरल्यानंतर मी नारायणरावांना फोन केला. नारायणराव हे काय करताय. म्हटलं मी साहेबांशी बोलतो बाहेर जाऊ नका. ते मला म्हणाले, तुम्ही बोला साहेबांशी. मी बाळासाहेबांना फोन लावला. म्हटलं त्यांची इच्छा नाही. जाऊ देऊ नका म्हणालो त्यांना. मला (बाळासाहेब) म्हणाले लगेच घेऊन ये घरी. म्हटलं नक्की ना. (बाळासाहेब) हो म्हणाले. मी नारायणरावांना फोन लावला. म्हटलं आताच्या आता इकडे या आपल्याला साहेबांकडे जायचं आहे. मला म्हणाले निघालोच. ते तिथून निघाले. मला परत 5 मिनिटांत बाळासाहेबांचा फोन आला. मला म्हणाले, अरे त्यांना नको बोलवूस, कोणतरी मागे बोलतोय असं मला ऐकू येत होतं. त्यानंतर काही नाही मला फोन करुन त्यांना सांगावं लागलं येऊ नका," अशी आठवण राज ठाकरेंनी सांगितली. "ज्याप्रकारे पक्ष, संघटना सुरु होता. ज्याप्रकारे लोकांना बाहेर काढलं सुरु होतं त्याचा शेवट हा. त्यांचं काय झालं याचा फरक नाही पडत. पण जे नाव लहानपणापासून पाहत आलो. ते टांगताना दिसू लागला तेव्हा त्रास होऊ लगाला," असंही राज ठाकरे म्हणाले. 

शिवसेना नाव आणि धनुष्यबाणावर भाष्य

शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाणावरुन शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये झालेल्या वादावरही राज यांनी भाष्य केलं. "शिवसेना आणि धनुष्यबाण हे तुझं का माझं का माझं का तुझं चालू होतं तेव्हा वेदना होत होत्या. इतकी वर्ष लहानपणापासून ते पक्ष पाहत आलो. पाहत काय आलो तो पक्ष जगलो. मला आजही आठवतंय की दुसरीत असताना माझ्या शर्टावर खिशाजवळ तो वाघ असायचा. तो ही बरोबर हृदयाच्या बाजूला. राजकारण लहानपणापासून पाहत आलो. अनुभवत आलो बाळासाहेबांबरोबर! असंख्य लोकांनी कष्ट घेऊन उभी केलेली, लोकांच्या घामातून उभा राहिलेला तो पक्ष, ती संघटना. मी त्या पक्षातून त्या पक्षातून बाहेर पडतो त्यानंतर इथे माझं ते भाषण झालं होतं. तेव्हा मी म्हटलेलं माझा वाद हा विठ्ठालाशी नाही आजूबाजूंच्या बडव्यांशी आहे. मी तेव्हा हे ही म्हटलं होतं हीच चार टाळकी हा पक्ष खड्ड्यात घालणार. हा पक्ष खड्ड्यात घातल्यानंतर त्यात वाटेकरी व्हायची माझी इच्छा नाही म्हणून मी बाहेर पडत आहे. आज हे सगळं राजकारण, झालेली परिस्थिती पाहिल्यावर 2006 ला पक्ष स्थापन केला त्या संपूर्ण भाषणात काय झालं कशामुळे झालं तो सगळा चिखल मला करायचा नव्हता. पण काही गोष्टी ज्या पसरवल्या गेल्या, राज ठाकरेला शिवसेनाप्रमुखपद पाहिजे होतं, संपूर्ण पक्ष त्याला आपल्या हातात पाहिजे होता. झूट!" असंही राज ठाकरे म्हणाले.